चिवारटेकडी येथे स्ट्रीट लाईट सुरू, डुमिंग आल्मेडानी लक्ष वेधताच उपनगराध्यक्षांकडून तात्काळ दखल
सिंधुदुर्ग राजू तावडे
सावंतवाडी शहरातील लता डिमेलो पाणंद परिसरातील चिवारटेकडी येथील स्ट्रीट लाईट गेले काही दिवस बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अंधाराचा सामना करावा लागत होता. सध्या ख्रिस्ती बांधवांचा सायबिण उत्सव सुरू असून, दिवाळी या दिव्यांचा सणालाही सुरुवात झाली आहे. याशिवाय या परिसरात गवारेड्यांचा वाढता वावर असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वारंवार मागणी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष झाले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डुमिंग आल्मेडा यांनी पुढाकार घेतला. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे या समस्येकडे लक्ष वेधले.
परिसरातील नागरिक, भाविक आणि विशेषतः रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ पावले उचलली. त्यांच्या निर्देशानंतर नगरपालिका प्रशासनाने चिवारटेकडी परिसरात तातडीने नवीन स्ट्रीट लाईट बसवून परिसर प्रकाशमय केला.
सण-उत्सवाच्या काळात आणि जंगली प्राण्यांच्या दहशतीदरम्यान प्रशासनाकडून ही तात्काळ कारवाई झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. याबद्दल चिवारटेकडी परिसरातील रहिवाशांनी भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष डुमिंग आल्मेडा आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे आभार मानले आहेत.


