मनसे स्थानिकांसोबत, प्रसंगी खळखटाक ही आमची भूमिका; माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर
मनसे स्थानिकांसोबत, प्रसंगी खळखटाक ही आमची भूमिका; माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर
सावंतवाडी/ राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जमिनी परप्रांतीय, दिल्ली व हरियाणा येथील उद्योजक बळकावत आहेत. पिंगुळी येथील ऐतिहासिक तलावावर बांधकाम व्यवसायाकडून सुरू असलेले बांधकाम व अतिक्रमण यासाठी स्थानिक लोकांसह जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर आंदोलन करीत आहे. मात्र त्याची दखल राज्यकर्त्यांकडून घेतली जात नाही हे दुःख आहे. हे सर्व प्रकार पाहता काही मराठी माणसे व मराठी अधिकारी या परप्रांतीयांना मदत करत आहेत, हे दुर्दैव म्हणावे लागेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बांदा येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.
पिंगळी पाझर तलाव प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर व सासोली येथे परप्रांतीय उद्योजकाने स्थानिक लोकांच्या जमिनीत केलेले अतिक्रमण व सासोलीतील स्थानिक लोकांना देण्यात येणाऱ्या धमक्या व त्रास याबाबत राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आपण हा दौरा केल्याचे श्री. नांदगावकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांना याबाबत अहवाल सादर करून त्यानंतर याविषयी मनसेची भूमिका ठरविण्यात येईल. मनसे स्थानिकांसोबत आहे. प्रसंगी खळखटाक ही आमची भूमिका असून, रस्त्यावरची लढाई आम्हाला नवीन नाही, असे श्री. नांदगावकर म्हणाले.
यावेळी बाळा नांदगावकर यांच्यासोबत शिरीष सावंत (नेता, मनसे)व सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक, संदीप दळवी (सरचिटणीस मनसे)
ॲड. अनिल केसरकर (जिल्हा अध्यक्ष, मनसे), मिलिंद सावंत (तालुकाध्यक्ष सावंतवाडी, मनसे), कुणाल किनळेकर (जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना, मनसे),
विनायक सावंत (उपजिल्हा अध्यक्ष, मनसे),
लक्ष्मण कुबल (तालुका अध्यक्ष दोडामार्ग, मनसे), संदीप गावस (उपतालुका अध्यक्ष दोडामार्ग, मनसे), मधुसूदन घाबल (सचिव मनसे), अतुल केसरकर (शहरअध्यक्ष दोडामार्ग), ॲड. राजू कासकर (ता. उपाध्यक्ष सावंतवाडी), गुरुदास गावडे (शहर अध्यक्ष सावंतवाडी), चिन्मय नाडकर्णी (शहर अध्यक्ष बांदा), काशिराम गावडे (विभाग अध्यक्ष आंबोली), दिनेश मुळीक (शाखा अध्यक्ष इन्सुली), साई कदम उपस्थित होते. यावेळी सासोली गावातील नागरिकांनी श्री. बाळा नांदगावकर यांना निवेदन सादर करून सासोली येथील परप्रांतीयांकडून चालू असलेली दडपशाही, दादागिरी याबाबत माहिती देऊन चर्चा केली.
सासोली येथील जमीन प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, ” विकासकाने बनावट कागदपत्रे व खोट्या सह्या करून १२५० एकर जमीन परप्रांतीय धनदांडग्यांच्या घशात घातली आहे. महिला व पुरुष बाउन्सर आणून हा विकासात गावात दहशत मजवित आहे. कोकणाचे कॅलिफोर्निया करू म्हणणारे आता कुठे गेले? राज ठाकरे यांनी आधीच कोकणी माणसाला जमिनी न विकण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत नेते आहेत, त्यांच्याकडे सद्सदविवेक बुद्धी आहे असे मला वाटते. त्यांची भेट घेऊन कोकणातील विनाशकारी विध्वंसक प्रकल्प, जंगल आणि जैवविविधतेचे नुकसान करणाऱ्या प्रकल्पांना बंदी घालावी अशी मागणी करणार आहे. तसेच शक्तिपीठ महामार्गाला जनतेचा विरोध असेल, तर मनसे जनतेसोबत रस्त्यावर उतरेल. ठेकेदारांचे पैसे द्यायला सरकारकडे निधी नाही. त्यांची विकासाबाबत केवळ घोषणाबाजीच सुरू आहे. असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
नांदगावकर म्हणाले, पिंगुळी पाझर तलावाच्या उपोषण स्थळी भेट दिल्यावर भयानक वास्तव समोर आले. तेथील स्थानिक ग्रामस्थ दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. परराज्यातील गाड्यांमधून महिला व पुरुष बाऊन्सर फिरत असून ते दहशत निर्माण करत आहेत. महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाझर तलावाचा आडोसा घेत प्लॉटिंग करून जागा विक्री करण्याच्या त्यांचा डाव आहे.
या गंभीर मुद्द्यावर आपण जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष चर्चा केली. ग्रामस्थांच्या मागण्या समजून घेऊन स्थानिकांना सहकार्य करावे, तसेच बाऊन्सर्सचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रशासनाला दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती पाहता येथे सुविधाचा अभाव दिसत आहे. येथील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. याबाबत मनसे काय भूमिका घेणार असा प्रश्न विचारला असता श्री. नांदगावकर म्हणाले, सिंधुदुर्गाचा विकास व्हावा म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या जिल्ह्याचा मुख्यमंत्री केला होता. या सरकारकडे शिक्षण व आरोग्य यासाठी बजेट कमी आहे. शेतकऱ्याला दिवाळीच्या सणाला पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा चालली आहे. या सरकारने कोकणचा विकास केला नाही, मात्र कोकण भकास केले. आहे असा आरोप त्यांनी केला. विकासाला आमचा कधी विरोध नाही. मात्र विकास करताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवा. येथील सर्व प्रश्न घेऊन आपण सद्स्थिती राज ठाकरे यांच्या समोर मांडणार आहे. तसेच या सर्व प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.


