संकुलातील गाळ्यांबाबत अभ्यासू व्यक्तिमत्व उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर गप्प का: संजू परब
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भिंत काढलेले गाळेधारक, पोट भाडेकरू, बंद गाळे याची यादी मुख्याधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केली. यात २० गाळेधारकांनी गाळ्यांची भिंत काढल्याचे प्रशासन सांगत आहे. याला विषयाला २५ वर्ष झाली असून त्याचे ऑडिट करून दंड वसूल केलाय. अशावेळी कारवाई करणे आवश्यक होते. बैठकीत हा विषय घेऊन काय साध्य केलं ? प्रशासनाने भिंती बांधून घेण आवश्यक होते. मात्र, या सभेला उपस्थित असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर याविषयी गप्प का राहिले ? पोटभाडेकरू नेमलेले गाळे ताब्यात घ्या, तरूण बेरोजगारांना ते गाळे द्या असे मत माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. यावेळी नगरसेविका ॲड नीता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, नगरसेवक देव्या सुर्याजी आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेकडे पोटभाडेकरू नेमल्याची यादी असताना प्रशासन गप्प का ? दुकान गाळे ताब्यात का घेत नाही ? ज्या भाडेकरुंना गाळे दिलेत ते पोट भाडेकरू नेमून २०-२० हजार भाड घेत असून नगरपरिषदेला दीड हजार भाड येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांत हिंमत असेल तर या भिंती बांधून घ्याव्यात असे आव्हान संजू परब यांनी दिले. या बैठकीत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर हे गप्प होते. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, ते का गप्प राहिले ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का ? असा सवाल त्यांनी केला.
संजू परब म्हणाले, नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते. पाणी पुरवठा सभापतींना क्लिनचीट दिली असे त्यांच्याकडून बोलले गेले. एकदा चौकशी लागली की सभागृहाला हा अधिकारी आहे का ? निर्दोष असल्याचे नगराध्यक्षा सांगू शकतात का ? उपनगराध्यक्ष गप्प का राहिले ? चौकशी समिती नेमण्यात आल्याचे मुख्याधिकारी यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे राजीनामा मंजूर करावा. सभागृहात काही विरोधी नगरसेवक पण क्लिनचीटला समर्थन करतात हे दुर्दैव आहे. नगरपरिषदेचा बाजार झालाय, आमच्या पक्षाचे नगरसेवक सोडून एकही नगरसेवक अभ्यास करत नाहीत. वाटल्यास कुणीही चर्चेला यावे. आमनेसामने चर्चा करायला माझी तयारी आहे असा इशारा श्री. परब यांनी दिला.
मुख्य रस्त्यावरील काल भरलेले खड्डे हे टेंडर न काढता भरले आहेत. नगराध्यक्ष आदेश देऊ शकतात. पण, टेंडर काढूनच काम होण आवश्यक आहे. आता एक लाखाचे बील दोन लाख झाले तर त्याला जबाबदार कोण ? भ्रष्टाचाराची बोंबाबोंब होऊन सुद्धा आता दुसरा भ्रष्टाचार होत आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी वेडीवाकडी काम करू नयेत. हे शहर माझे आहे. नगराध्यक्ष म्हणून मी काम केलय आता नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. तसेच मोती तलावाच सुरू असलेल काम मला पसंत नाही. तळ्यातील वनस्पतीचे मुळापासून उच्चाटन झाले पाहिजे. यासाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार आहे. असे श्री. परब म्हणाले.


