वाचन संस्कृतीतूनच आत्मविश्वास मिळतो : प्रा. डॉ. धनराज गोस्वामी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
“वाचनाची आवड निर्माण झाली की ज्ञानाची वृद्धी होते. वाचनामुळेच भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपण आपली स्वतंत्र व निर्भीड मते मांडू शकतो. आजच्या काळात सामाजिक आणि राजकीय अधःपतन होत असताना वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी केले.
नगर वाचनालय वेंगुर्ले यांच्या वतीने आयोजित विविध पुरस्कार वितरण आणि शालेय विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्राचार्य डॉ. गोस्वामी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार श्री. अभिमन्यू लोंढे (दैनिक लोकसत्ता व रत्नागिरी टाइम्स), सौ. सुशीला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार: डॉ. जी. ए. बुवा (सावंतवाडी), टाककर शेट्ये ट्रस्ट पुणे पुरस्कृत साहित्य पुरस्कार श्रीमती कल्पना बांदेकर (सावंतवाडी), स्व. विष्णूपंत गणेश नाईक आदर्श ग्रंथालय पुरस्कार श्री. रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा अध्यक्ष बाबाजी भिसे, स्व. श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार आनंद देवळी (मळगाव), स्व. लक्ष्मीकांत सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार सौ. स्नेहा नारिंगणेकर (शिरोडा) आणि स्व.कृष्णा न्हानू आसोलकर स्मृती बालसाहित्य पुरस्कार: महेश पांडुरंग काणेकर (कणकवली) यांना देऊन प्राचार्य डॉ. गोस्वामी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
वेंगुर्ले नगर वाचनालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, पाठांतर आणि चित्रकला स्पर्धांमधील सुमारे ८७ विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगर वाचनालयाचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, कार्यवाह कैवल्य पवार, उपकार्यवाह सौ. माया परब, सदस्य राजेश शिरसाट, दीपराज बिजीतकर, नंदन वेंगुर्लेकर, हिशोब तपासणीस सखाराम सौदागर, ग्रंथपाल किशोर सावंत, सहाय्यक ग्रंथपाल पुजा धावडे, लिपिक जेनी डिसोझा, शिपाई दिगंबर सातार्डेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत कैवल्य पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन महेश बोवलेकर यांनी केले.


