डॉ.वज्राटकर यांनी केलेली रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा …. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. निरवडेकर
सिंधुदुर्ग /राजू तावडे
डॉ. पांडुरंग वज्राटकर यांनी केलेली रुग्णसेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा आहे. शासकीय नियमानुसार ते जरी आज सेवा निवृत्त होत असले तरी त्यांच्या अनुभवाचा लाभ पुढील दोन वर्षे सावंतवाडीलाच मिळावा, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे, सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सांगितले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. वज्राटकर यांच्या निवृत्तीचा निरोप समारंभात आज शनिवारी आयोजित केला होता. यावेळी ॲड. निरवडेकर बोलत होते. विविध मान्यवरांनी डॉ. वज्राटकर यांच्या सेवाभावी कार्याचा यावेळी गौरव केला.या सोहळ्याला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सौ. मोहिनी वज्राटकर, डॉ. अनिकेत वज्राटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, प्रफुल्ल वालावलकर, राजू मसुरकर, भास्कर केरवडेकर, डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ गिरीश कुमार चौगुले, डॉ. अभिजित चितारी, तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अनिल निरवडेकर पुढे म्हणाले, रुग्णांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. वज्राटकर यांनीही रुग्णसेवेचा आदर्श निर्माण केला असून डॉक्टरांनी संवादकौशल्य कसे असावे, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
यावेळी बोलताना डॉ. अमोल पावसकर यांनी त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सांगत, डॉ. वज्राटकर यांचा ज्ञानेश्वरीवरील अभ्यास आणि रुग्णांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.
रवी जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियनची आवश्यकता असल्याचे सांगत, डॉ. वज्राटकर यांनी निवृत्तीनंतरही आधुनिक उपचारपद्धती स्वीकारून सेवा सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सोन्सुरकर यांनी केले.


