निष्कलंक आणि निरपेक्ष समाजकार्याचा कार्याचा गौरव… कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर
सिंधुदुर्ग |राजू तावडे
निष्कलंक आणि निरपेक्ष हेतूने ज्यांनी समाजात कार्य केले त्या कार्याचा गौरव आज कोकण मराठी साहित्य परिषदेने केला आहे. आज कोमसापचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व सेवानिवृत्त जिल्हा कामगार अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर या दोघांचे व्यक्तिमत्व निष्कलंक आहे. राजकारण, समाजकारणात नव्या पिढीसाठी आदर्श अशी ही व्यक्तीमत्व आहे असे गौरवोद्गार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काढले.
स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले तर स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कार शेखर पाडगांवकर यांना आज शुक्रवारी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस उपस्थित होते.
मळगाव इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी कोमसाप शाखा सावंतवाडीकडून कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर आणि सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांचाही सन्मान करण्यात आला.
आजचा पुरस्कार माझा उत्साह वाढवणारा अन् प्रेरणा देणारा असल्याची भावना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. जनतेच्या साथीने मी आमदार, मंत्री झालो. जनरल जगन्नाथराव भोसले, प्रतापराव भोसले, भाईसाहेब सावंतांचे मार्गदर्शन मला लाभले. जयानंद मठकर, शिवरामराजे भोसले यांचीही साथ विकासात लाभली. माझ्या कुटुंबाने दिलेली साथ फार महत्त्वाची आहे. शरद पवार यांना मान्य नसतानाही कोकणचे पर्यावरण राखले जावे म्हणून मी काही भुमिका घेतल्या. कोकण हिताच्या भुमिका घेतल्यामुळे मी राजकारणात मागे पडलो. पण, त्याचे मला दुःख नाही असे श्री. भोसले म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना श्री. शेखर पाडगांवकर म्हणाले, आजचा सोहळा हा अद्वैत सोहळा आहे. आयुष्यभर निरपेक्षपणे केलेल्या काम फळ मला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस म्हणाले, प्रवीण भोसले व शेखर पाडगांवकर यांच कार्य कौतुकास्पद आहे. समाजात निरपेक्ष हेतूने काम करणारी फार कमी व्यक्तीमत्व उरली आहेत. त्यामुळे नव्या पिढीने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी व्यासपिठावर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, ऐक्यवर्धक संघ मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ, स्कुल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, कर्नल सुभाष भोसले, सौ. अनुराधा भोसले, अजय भोसले, कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रा. दिवाकर मुरकर, प्रा. सुभाष गोवेकर, डॉ. दीपक तुपकर, रामदास पारकर, दिनानाथ नाईक, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, कृष्णाजी कोठावळे, चंद्रकांत जाधव, गुरुनाथ गांवकर, नाना नाईक, व्ही.टी. देवण, गुरूनाथ नार्वेकर, विठ्ठल सावंत, निरज भोसले, प्रियांका सावंत, संदेश केरकर, विश्वनाथ आडारकर, सुचिता सावंत आदींसह कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले. सूत्रसंचालन सहसचिव विनायक गांवस तर आभार सचिव राजू तावडे यांनी मानले.


