आमदार दीपक केसरकर यांनी स्वतः राजीनामा द्यावा …. माजी आमदार परशुराम उपरकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
आमदार दीपक केसरकर यांच्या बद्दल जनतेत आता सहानभूती राहिली नाही. दीपक केसरकर यांचे खरे रूप भोंदू खरात बाबाच्या माध्यमातून उघड झाले आहे. दीपक केसरकर यांनी कोणतेही खुलासे न करता आता स्वतः राजीनामा द्यावा, अशी मागणी उबाठा शिवसेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आज गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दीपक केसरकर शालेय मंत्री असताना या जिल्ह्यात डीएड, बीएड बेरोजगारांनी मोर्चे काढले. या आपल्या जिल्ह्यातील बेरोजगारांना शिक्षण मंत्री असून केसरकर यांनी न्याय दिला नाही. मात्र भोंदू खरात याच्या भावाला शालांत आयडी देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे. दीपक केसरकर यांच्या काळात भोंदू खरातच शिक्षण खाते चालवत होता हा खासदार संजय राऊत यांच्या आरोप खरा आहे. केसरकर यांनी मंत्रीपदाला न्याय दिला नाही. त्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जागा दाखवून दिली आहे. शासनाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मोडणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असे श्री. उपरकर म्हणाले.
शिवसेना पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोणाच्याही पैशावर मोर्चा काढणारी हि शिवसेना नाही, हे आमच्या मोर्चावर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. केसरकर यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी उपरकर यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, रमेश गावकर, आबा चीपकर, राजू शेटकर, आशिष सुभेदार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


