सफाई कामगारांच्या वारसांना लवकरच नियुक्ती पत्रे दिली जातील, मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
आज बुधवारी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे बंदरे विकास आणि मत्स व्यवसाय मंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेऊन सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने तात्काळ नोकरी मिळणे बाबत कार्यवाही करावी असे निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत सफाई कामगारांचे वारस प्रतिनिधी सर्वश्री गोपाळ नामदेव सावंत, सुनील नारायण परब, संदीप भागू पाटील व नितीन सदानंद कदम हजर होते.
महाराषट्र शासन या बाबत अत्यंत सतर्क असून तसे निवेदन नगर विकास मंत्रालयाचे वतीने मागील अधिवेशनात केले आहे. व त्या अनुषंगाने लवकरच सावंतवाडीत सफाई कमगारांना नोकरी देण्यात येईल. सावंतवाडी नगर परिषद कौन्सिलने एक मताने सफाई कामगारांना त्वरित नोकरी द्यावी असा ठराव मंजूर केल्याचे मंत्री महोदयांनी यावेळी स्पष्ट केले.
आपल्या पुढील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती पत्रे दिली जातील, असे आश्वासन पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी श्री. प्रवीण भोसले यांना दिले आहे. शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांचे यावेळी आभार मानले.


