एमआयडीसी बेकायदा माती उपसा प्रकरणी तहसीलदार आणि पीआयची नार्को टेस्ट करा, संजू परब
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरातील आठ ते दहा एकर परिसरात सुरू असलेला बेकायदेशीर माती उपसा स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही, या प्रकरणात महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संगनमत आहे. “ही फक्त माती चोरी नाही; हा कोट्यवधींच्या नैसर्गिक संपत्तीचा संगनमताने झालेला डल्ला आहे,” असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज शुक्रवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख क्लॅट्स फर्नांडिस उपस्थित होते.
परब म्हणाले, “एमआयडीसी परिसरात काहींनी प्लॉट घेतले असले तरी प्लॉट डेव्हलपमेंटच्या नावाखाली खनिज सदृश मातीचा सर्रास बेकायदेशीर उपसा करण्यात आला. तब्बल आठ ते दहा एकर जमीन खोदून माती चाळली गेली, ट्रकच्या ट्रक बाहेर गेले, मात्र ‘आंधळे, बहिरे प्रशासन मुग गिळून गप्प’ बसले. हा प्रकार म्हणजे शासनाच्या भ्रष्ट संगनमताचा पुरावा आहे.”
“गावात सुरू असलेल्या प्रत्येक हालचालीची माहिती पोलीस पाटलाने पोलीस निरीक्षकांना देणे कायदेशीर बंधनकारक असते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणातील उत्खननाची माहिती प्रशासनाला नव्हती का? की माहिती असूनही अर्थपूर्ण तडजोडीतून हि डोळेझाक करण्यात आली?” असा आरोप परब यांनी केला.
या गंभीर प्रकरणाची माहिती आपण दोन दिवसांपूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांना व्हॉट्स ॲपद्वारे दिली असल्याचे परब यांनी सांगितले. “ दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना तातडीने लक्ष घालता आले नाही; मात्र आता या भ्रष्ट टोळीचा पर्दाफाश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. हा माती उपशाचा काळाबाजार गेल्या महिना-सव्वा महिन्यापासून सुरू असल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.
“ही चोरी नेमकी कुठे गेली, यामागे कोणते रॅकेट आहे, हे शोधायचे असेल तर आधी तहसीलदार आणि पीआयची नार्को टेस्ट करा. या प्रकरणात तात्काळ गुन्हे दाखल करून मुख्य सूत्रधारांना अटक न केल्यास “शिवसेना स्टाईल” आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा संजू परब यांनी प्रशासनाला दिला आहे.


