जबरदस्तीने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरविरोधात ग्राहकांना कायदेशीर लढ्यासाठी मदत.
सिंधुदुर्ग / मनोज घाटकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय किंवा जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत अशा ग्राहकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने स्वतंत्र नमुना तक्रार अर्ज तयार करण्यात आले आहेत.
ग्राहक उपस्थित असताना स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या प्रकरणांसाठी तसेच ग्राहक गैरहजर असताना स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या प्रकरणांसाठी स्वतंत्र लेखी तक्रार अर्जाची PDF प्रत आज सर्व ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
संघटनेने ग्राहकांना आवाहन केले आहे की, तक्रार अर्जासोबत वीज बिलाची झेरॉक्स प्रत तसेच स्मार्ट मीटर नको असल्याबाबत यापूर्वी दिलेले हरकत पत्र जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी.
याशिवाय, लवकरच आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात महावितरण (MSEB) व स्मार्ट मीटर बसविणाऱ्या संबंधित कंपनीविरोधात लेखी अर्ज सादर करण्याचे नियोजन करण्यात येत असून, त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन लाख साठ हजार पेक्षा जास्त एकूण वीज ग्राहक असून त्यापैकी 98 हजार पेक्षा जास्त वीज ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत. 30 जून पर्यंत किमान पंचवीस हजार अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि इतर सर्व तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या मदतीने आणि सरपंच संघटना सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने तक्रार अर्ज दाखल करण्याचं आमचं नियोजन आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटर संदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी व आक्षेप यांना कायदेशीर व संघटित पद्धतीने वाचा फोडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


