सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर दमदार पावसाने पुनरागमन केले असून गेले पंधरा दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली आहे.
सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, माणगावसह अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भात लागवड आणि शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आजच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून शेतीच्या कामांना वेग येणार आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात पुढील काही दिवस चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


