सावंतवाडी शहरात रस्त्यांच्या खोदाईमुळे अनेक समस्या, नगरसेवक आहेत कोठे ?..उबाठा सेनेचे आशिष सुभेदार
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी शहरात सध्या प्रत्येक प्रभागात रस्त्यांची, पाण्याची, लाईटची अवस्था अतिशय वाईट आहे. आज सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभागात झालेल्या रस्त्यांच्या खोदाईमुळे वाहन चालवणे किंवा पायी चालणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. प्रशासन गेली पाच वर्ष सुसेगात होते आणि आता जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ही सावंतवाडी शहरात पावसाळा सुरू झाल्यानंतर दिसतच नाहीत. हे सर्व नगरसेवक आहेत कोठे? मुख्याधिकारी विनायक औंधकर व नगराध्यक्ष सौ. श्रद्धा भोसले जनतेच्या या सर्व समस्यांची उत्तर देतील का ? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केला आहे.
प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे की, सावंतवाडी शहरात सध्या अनेक समस्या आहेत. रस्ते, पाणी, वीज पुरवठा सुरळीत नाही, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे असे असताना या मूलभूत प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नाही. गेले काही दिवस नगरसेवक कुठे आपल्या प्रभागात दिसतही नाहीत. हे नगरसेवक कुठे गायब झाले आहेत का? त्यांचा शोध घेऊन ते नेमके गेलेत कुठे हे पालिका प्रशासन व सत्ताधारी यांनी स्पष्ट करावे.
सावंतवाडी खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकांमाबाबत शिवसेना उबाठा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिलेल्या इशारा नंतर प्रभागातील विकासकामाना सुरुवात करण्यात आली आहे. खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात गटबाजी असल्यामुळे अनेक कामे ठप्प झाली होती. त्यात ठेकेदार व प्रशासनाच्या चुकीमुळे अर्धवट स्थितीत तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यात नगरसेवक यांच्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने त्याचा फटका या प्रभागातील विकास कामांवर होत आहे. असा आरोप श्री. आशिष सुभेदार यांनी केला.
आता पावसाळा सुरू झाला असून विकासकामे तसेच पाइप लाईनची कामे पूर्ण होणार कधी, असा सवाल सुभेदार यांनी केला. कचऱ्याची दुर्गंधी, लाइन वरील झाडी तोडणे, स्ट्रीट लाईनची कामे, अर्धवट गटार बांधकाम हे प्रमुख कामे रखडली आहेत. तर खोदाई देखील चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत. काही कामे पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पाणी तुंबून लोकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. या कामाची त्वरित अंमलबजावणी नझाल्यास नागरिकांना घेऊन नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढू असा इशारा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला आहे.


