रत्नागिरी स्टेशनवरील छत कोसळले
रत्नागिरी/ वृत्तसंस्था
मुसळधार पावसाचा दणका रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसला आहे. नेहमी प्रवाशांची प्रचंड वर्दळ असणाऱ्या या स्थानकातील छताचा तब्बल ५० ते ६० फुटांचा मोठा भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली
या स्थानकाचे काही दिवसांपूर्वीच अतिशय देखणे सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात हे छत कोसळल्याने रेल्वे प्रशासनाचा आणि कंत्राटदाराचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील सर्वात महत्त्वाचे आणि २४ तास गजबजलेले स्थानक मानले जाते. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक स्थानकाच्या मुख्य छताचा मोठा भाग ५० ते ६० फूट खाली कोसळला.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम ‘ज्ञाती’ नावाच्या कंपनीला कंत्राट देऊन करण्यात आले होते. नव्याने नटवलेल्या या रेल्वे स्थानकाच्या छताला गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणावर गळती लागली होती. त्यावेळीही प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, त्यातून कोणताही धडा न घेता दुरुस्ती न केल्याने अखेर आज अख्खे छतच खाली आले.


