न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नळ पाणी योजनेच्या कामाला मुदत वाढ नको, उपनगराध्यक्ष ॲड निरवडेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग / राजू तावडे

  सावंतवाडी नळ पाणी योजनेचे आजपर्यंत झालेले काम निष्कृष्ट दर्जाचे आहे. ही नळ पाणी योजना म्हणजे सावंतवाडीच्या अस्मितेचा आणि लोकांच्या गरजेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे ठेकेदाराने आज पर्यंत केलेल्या कामाच्या दर्जाची खात्री केल्याशिवाय ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येऊ नये. मुदत वाढ दिल्यास हे अत्यंत चुकीचे व जनतेच्या हिताच्या विरुद्ध होणार आहे. त्यामुळे मुदतवाढीस माझा पूर्णपणे विरोध आहे, असे सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आज जिल्हाधिकारी यांना नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले.

सावंतवाडी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी ५७ कोटी नळ योजनेचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू झाले. या योजनेबद्दल जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. नळ पाणी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला होता. याची दखल घेत सावंतवाडी नळपाणी योजनेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी करावी, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, प्रकल्प निर्धारित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, याची खात्री करावी असे निर्देश पालकमंत्री राणे यांनी आढावा बैठकीनंतर दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज सावंतवाडी नगरपरिषदेत भेट दिली. त्यांनी नळ पाणी योजनेची प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका सभागृहामध्ये नगरसेवक, ठेकेदार यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपनगराध्यक्ष श्री. निरवडेकर यांनी नळ पाणी योजनेबद्दल जोरदार आरोप केले. त्यांना नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी ही साथ दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक बाबू कुडतरकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तौकीर शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र टेमकर,महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे, शिवसेनेच्या नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, ठेकेदार जगताप तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व नगरपरिषदेचे अभियंता उपस्थित होते.

यावेळी निरवडेकर म्हणाले, पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष काम हे दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाले. मात्र करारनाम्यातील अटी व शर्तींचा ठेकेदाराने वारंवार भंग केला आहे. सावंतवाडीकराना भविष्यात २४ तास पाणी मिळावे या उद्देशाने ही योजना केली आहे. मात्र ठेकेदाराचे काम पाहतात कामाचा मूळ उद्देश सफल होईल असे वाटत नाही. योजनेबाबत संशय व कामाच्या दर्जाबाबत आरोप केले जात आहेत. आमच्यासाठी हे आरोप अत्यंत घातक व बदनामी करणारे आहेत.

हे काम प्रशासकीय काळात सुरू होते. नगरपरिषदेची निवडणूक होऊन नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर माझ्याकडे काही काळ नगराध्यक्ष पदाचा प्रभारी पदभार आला. त्यावेळी २२ मार्च २०२६ रोजी स्विकृत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे यांनी या कामाबाबत लेखी तक्रार दिली. त्यामुळे मी याविषयी चर्चा करण्यासाठी २३ मार्च २०२६ रोजी तात्काळ सभा बोलावली. या सभेत नळ पाणी योजनेच्या कामाबाबत जी चर्चा झाली त्यातून असे निदर्शनास आले की, कराराप्रमाणे पाईप टाकताना १५ सेंटीमीटर सोलिंग, १२ सेंटीमीटर खडीकरण्याचे दोन थर, ५० एमएम जाडीचे एम पी एम याच्यावर २० मिमी ओपन कार्पेट टाकून त्यानंतर रस्ता हॉटमिक्सने करणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदाराने याचे उल्लंघन करून काही ठिकाणी जो रस्ता केला तो कोल्डमिक्सने केला आहे. कराराप्रमाणे कंपनीने सावंतवाडी शहरात आपले कार्यालय सुरू करून त्यामध्ये उच्चशिक्षित निवासी अभियंता, एक पदवीधर अभियंता, इतर स्टाफ, सर्वे साहित्य व क्षेत्रीय प्रयोगशाळा स्थापन करणे गरजेचे होते. मात्र त्याची कोणतीही कार्यवाही ठेकेदारांनी केली नाही. त्याचप्रमाणे काम सुरू झाल्यापासून म्हणजे नोव्हेंबर २३ पासून कामाचे दैनंदिन व्हिडिओ शूटिंग करणे व हालचाल रजिस्टर मध्ये नोंद घेणे गरजेचे होते. याचे कोणतेही पालन न करता २३ मार्च २०२६ पर्यंत ठेकेदाराला अंदाजे १७ कोटीचे बिल अदा करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांना सदर काम बंद करण्याबाबत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून मी ठेकेदाराला सूचना देण्यास सांगितले. त्याप्रमाणे ३० मार्च रोजी त्यांनी ठेकेदाराला नोटीस दिली. या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण विभागामार्फत तांत्रिक तपासणी करून ऑडिट रिपोर्ट सादर होईपर्यंत कोणतेही काम करू नये व त्यांना बिल अदा करण्यात येऊ नये, असे आदेश आपण दिले होते. असे यावेळी श्री. निरवडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

नगरसेवक सिद्धार्थ भांबूरे यांनीही नळ पाणी योजनेच्या कामाबाबत अनेक दोष यावेळी सांगितले. ही नळ पाणी योजना बोगस असल्याचे ते म्हणाले. 

पालिकेला ठेकेदाराने केलेल्या करारनाम्यातील अटीची पूर्तता केलेली नाही असे असताना 28 कोटी रुपयांचे बिल आदा करण्यात आले. कामाच्या ढिसाळपणामुळे सावंतवाडी शहरातील रस्ते आणि पाणी नियोजन मुळे नागरिक संतप्त झाले आहेत त्यांच्या रोषाला आम्हा सर्व नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे, असे भांबुरे म्हणाले. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी संबंधित ठेकेदार व इंजिनियर यांना चांगलेच धारेवर धरत तुम्हाला कामाचे पैसे दिले आहेत मग कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण कशी नाहीत . सर्व नगरसेवक आणि जनता तुमच्या कामाबद्दल नाराज आहे तुमच्या कामात सुधारणा करा उर्वरित काम दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण व्हायलाच हवे. करारनाम्यात अटी शर्थीचे पालन करा अशा सूचना केल्या. आमदार दीपक केसरकर यांनी या योजनेच्या कामात संबंधितांकडून काही चुका झाल्या आहेत ते त्यांनी कबूल केले आहेत. आता ही योजना पुढे घ्यायची आहे त्यामुळे पुढील कामे उत्तमरीत्या करा आणि समन्वय साधून कामे करा असे स्पष्ट केले.

यावेळी ॲड सिद्धार्थ भांबुरे, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी तैकीर शेख, देवेंद्र टेमकर, सुकन्या टोपले, बाबू कुडतरकर आदिनी नळ पाणी योजनेचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाले आहे असे सांगितले. अनेक बाबी त्यांनी उघड केल्या. चांगल्या दर्जाचे काम व्हायला हवे असे स्पष्ट केले. यावेळी ठेकेदार श्री जगताप यांनी सावंतवाडी शहराची एकंदरीत भौगोलिक स्थितीमुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट केले.

या नळ पाणी योजनेला मूदतवाढ द्यायची असेल तर कराराप्रमाणे काम किती टक्के झाले आहे. योजनेचे काम करारनामाप्रमाणे प्रत्यक्ष जाग्यावर चालू आहे का? व कराराची अंमलबजावणी होत आहे का? झालेल्या कामाप्रमाणे रस्त्याचे रीस्टोअरींग कराराप्रमाणे आहे काय ? करारातील अटी व शर्ती भंग झालेले असल्यास यापूर्वी त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली. याचा विचार करून करण्यात यावा, असे अशी मते यावेळी काही नगरसेवकांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे