स्वर्गीय विकासभाईंचे जीवन युवा पिढीसाठी प्रेरणादायी; विक्रम सावंत
सिंधुदुर्ग / राजू तावडे
स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या मूल्याधिष्ठित नेतृत्वाचे संस्कार घेऊन विकासभाईंनी सुमारे तीन दशके शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि विधायक मार्गदर्शनाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे निर्व्यसनी, शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम जीवन आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श आहे.” असे गौरव उद्गार शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष व स्वर्गीय विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांनी काढले.
शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे कै. विकासभाई भालचंद्र सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ‘विकासभाई–एक आश्वासक पर्व’ हा भावपूर्ण स्मरणसोहळ्याचे आज आयोजित करण्यात आले होते. यावेळी विकासभाईंच्या आठवणींना उजाळा देताना श्री विक्रांत सावंत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, विकासभाईंनी उभा केलेला शैक्षणिक वटवृक्ष आज हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कारांची सावली देत आहे. “मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असलो, तरी या वटवृक्षाचे खरे राखणदार संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, शालेय समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य आहेत. विकासभाईंच्या विचारांचा वारसा आणि वसा जपत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल व संस्कारक्षम करण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील.”
स्वर्गीय विकास भाई सावंत यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा यामधील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
या स्मरणसोहळ्यास शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, तसेच संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे, संदीप राणे, चंद्रकांत सावंत, वसुधा मुळीक, छाया सावंत, स्नेहा परब, आणि डॉ. नितीन सावंत, सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, संदीप भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्य सविता माळगे, पर्यवेक्षक नामदेव मुठे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वामन ठाकूर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.


