बांदा वाफोली येथील कायनेको एक्सल कंपनीमध्ये मनसे कामगार युनियनची स्थापना
सिंधुदुर्ग / राजू तावडे
बांदा वाफोली येथील कायनेको एक्सल कंपनीमध्ये मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज गुरुवारी मनसे कामगार संघटनेच्या युनियनची स्थापना करण्यात आली. यावेळी मनसे कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस गजानन राणे , मनसे नेते व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व संदीप दळवी, जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत उपस्थितीत होते.
कायनेको एक्सल कंपनीमध्ये स्थानिक शेकडो तरुण गेली दोन ते अडीच वर्ष काम करीत आहेत. हे सर्व कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करत असताना कंत्राटदार याच्याकडून कामगारांना त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते. कामगारांना त्यांचा हक्काचा बोनस देण्यात येत नव्हता तसेच आरोग्याच्या समस्या, काम करताना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या, अतिशय कमी पगार असताना देखील हे सर्व स्थानिक तरुण केवळ आपल्या गावाजवळ काम मिळते म्हणून या कंपनी मध्ये काम करत आहेत. मात्र वारंवार या सर्व मागण्यांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून आल्यानंतर यासर्व स्थानिक कामगारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला व या कंपनी मध्ये लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी व अन्य पदाधिकारी यांनी यापूर्वी कंपनी मध्ये भेट देऊन कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा देखील केली होती. मात्र त्यानंतर देखील कामगारांना देण्यात येणाऱ्या वागणूकीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्यानंतर आज अखेर मनसेच्या कामगार युनियनची अधिकृत घोषणा करण्यात आली. यानंतर या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंपनीच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. कामगारांना ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान कंपनीतर्फे देखील या सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कामगार युनियनच्या युनिट अध्यक्ष पदी साईदत्त कदम, उपाध्यक्ष पदी रोहिदास पांचाळ, खजिनदार योगेश सावंत, सरचिटणीस अनुज मेस्त्री, तर चिटणीस पदी वासुदेव कुडव यांची निवड करण्यात आली.
यावेळी सुधीर राऊळ, राजू कासकर, चिन्मय नाडकर्णी, सतीश आकेरकर, केतन सावंत, काशीराम गावडे, महेश परब, नरेश देऊलकर, सनी राणे, गणेश वाईरकर, राकेश परब, विष्णू वसकर, व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


