सिंधुदुर्गातील निसर्ग हा भारतातील एक अतिमुल्यवान ठेवा : डॉ. जयेंद्र परुळेकर
सिंधुदुर्ग राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग हा सामान्य नसून अतिशय दुर्मिळ प्रकारचा आणि अतिसंवेदनशील आहे.असा जैवविविध निसर्ग निर्माण व्हायला अडीच हजार वर्षे लागतात.
म्हणूनच येथील निसर्ग हा जगातील ३६ जैवविविधता हाॅटस्पाॅट पैकी एक आहे. एकंदरीत पश्चिम घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग हा भारतातील एक अतिमुल्यवान ठेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले.
नुकतीच आंबोली चौकुळ येथील डार्क फाॅरेस्ट रिसाॅर्ट येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब या डॉक्टरांच्या संस्थेतर्फे परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉक्टर जयेंद्र परुळेकर बोलत होते. या परिषदेत अनेक गंभीर वैद्यकीय विषयांवर विविध तज्ज्ञ डॉक्टरांची लेक्चर्स झाली त्याच बरोबर “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता आणि त्या समोरील आव्हाने” या विषयावर एक परिसंवाद संपन्न झाला.
सदर परिसंवादात डॉ. जयेंद्र परुळेकर, वन्यजीव रक्षक संजय सावंत, पक्षीतज्ज्ञ भाग्यश्री परब, फुलपाखरू आणि चतूर यावर संशोधन करणारे हेमंत ओगले आणि डॉ. दत्तप्रसाद सावंत, आंबोली येथील जैवविविधता अभ्यासक काका भिसे यांनी सहभाग घेतला.
तिलारी क्षेत्रात पट्टेरी वाघाचे बारमाही अस्तित्व आणि गेले काही वर्षे विकसित होत असलेले व्याघ्र प्रजनन स्थळ या बाबतीत संजय सावंत यांनी विस्तृत विवेचन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास २५० च्या हून जास्त विविध पक्षांच्या प्रजाती आढळत होत्या आता तो आकडा ४०० पार झाला आहे. बेसुमार होत असलेली वृक्षतोड ही जिल्ह्यातील विविध दुर्मिळ होत चाललेल्या पक्षांच्या अधिवासासाठी घातक आहे, याबाबत भाग्यश्री परब यांनी चिंता व्यक्त केली.
हेमंत ओगले यांनी १६०० किमी लांबीच्या पश्चिम घाटाच्या जैवविविध निसर्गाचाच आढावा घेत आंबोली चौकूळ परिक्षेत्रात आढळणाऱ्या विविध फुलपाखरांच्या प्रजाती तसेच त्यांनी आणि देवगड येथील संशोधक डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी संयुक्तपणे चौकूळ येथे शोधलेल्या “चतूर” किटकाच्या नव्या प्रजाती संदर्भात माहिती दिली. काका भिसे यांनी जैवविविधता,पर्यटन आणि उद्भवणारे धोके तसेच अनेक शासकीय धोरणे आणि जैवविविध निसर्गावरील संकट या बाबत मार्गदर्शन केले.
मायनिंग, अवैध मायनिंग, शक्तीपीठ महामार्गा सारखे प्रकल्प हे येथील निसर्गासाठी कसे कायमस्वरूपी धोकादायक ठरतील यावर परिसंवादात विस्तृत चर्चा झाली.


