कुणकेरी नंबर १ शाळेत उपक्रमशील शिक्षणाचा आदर्श; विद्यार्थ्यांच्या क्षमतांना मिळतेय मुक्त व्यासपीठ
सिंधुदुर्ग / मनोज घाटकर
कुणकेरी नंबर १ शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमतांना चालना देत विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. उपक्रमांची संख्या वाढविण्यापेक्षा प्रत्येक उपक्रमामागील शैक्षणिक उद्देश आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणाऱ्या क्षमता यांना प्राधान्य दिले जात असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांच्या शाळा भेटीदरम्यान निदर्शनास आले.
श्री.राजेंद्र कांबळे प्राचार्य यांच्यासोबत विषय सहाय्यक सुनील करडे, श्री. प्रशांत भोसले ग्यानप्रकाश फाऊंडेशन यांनी मंगळवारी (११ ऑगस्ट) कुणकेरी नंबर १ शाळेला भेट देऊन शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक तथा लेखक विठ्ठल कदम, श्री.प्रसाद डेगवेकर सर, श्रीम. स्नेहप्रभा वैज मॅडम आणि श्रीम.गीता घोलप मॅडम, श्री.दत्तात्रय कदम सर यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली.
बहुवर्गीय अध्यापनातून प्रभावी शिक्षण
शाळेत पहिली, दुसरी आणि तिसरीचे विद्यार्थी एकत्रितपणे गटाधारित पद्धतीने शिकत असताना दिसून आले. मर्यादित शिक्षकसंख्येतही नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची संधी दिली जात आहे. वाचन, लेखन, संख्याज्ञान यांसोबतच विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती, आत्मविश्वास, प्रश्न समजून घेण्याची क्षमता आणि विचार मांडण्याची तयारी विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
‘आज काय नवीन?’ उपक्रमातून अनुभवांना मिळतो शब्द
विद्यार्थ्यांनी मागील दिवशी पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा अनुभवलेल्या नवीन गोष्टी छोट्या कागदावर लिहून शाळेतील विशेष बॉक्समध्ये टाकायच्या. त्यातील निवडक अनुभव दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी संपूर्ण शाळेसमोर वाचले जातात. या उपक्रमातून निरीक्षण, लेखन, आकलन, अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास यांसारख्या अनेक कौशल्यांचा विकास होत आहे.
‘सृजनानंद फलक’ यातून प्रश्न विचारण्याची सवय
शाळेतील ‘सृजनानंद फलक’ हा विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा उपक्रम ठरला आहे. दररोज विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार प्रश्न दिला जातो. विद्यार्थी त्याचे उत्तर शोधून वहीत नोंद करतात. त्यामुळे प्रश्न विचारणे, माहिती शोधणे, तर्क करणे, निरीक्षण करणे आणि स्व-अध्ययनाची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे.
वाहतूक नियमांचे प्रत्यक्ष शिक्षण
रस्ता, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, रेल्वे क्रॉसिंग, पूल, बोगदा आणि पेट्रोल पंप आदींच्या प्रतिकृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण दिले जाते. केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून जीवनोपयोगी ज्ञान देण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
‘माझे दुकान माझ्यासाठी’तून गणितासोबत व्यवहारज्ञान
‘माझे दुकान माझ्यासाठी’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य माफक दरात उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थी स्वतः वस्तू निवडणे, दरपत्रक वाचणे, पैसे देणे, उर्वरित रक्कम तपासणे, व्यवहाराची नोंद करणे आणि बिल जमा करणे अशा प्रत्यक्ष कृती करतात. त्यामुळे गणित, वाचन, लेखन आणि व्यवहारज्ञानासोबतच प्रामाणिकपणा व जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत आहे.
उपक्रमांपेक्षा उपक्रमामागील विचार महत्त्वाचा
कुणकेरी नंबर १ शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ उपक्रमांची रेलचेल नसून विद्यार्थ्यांची क्षमता, गरज, अनुभव आणि शिकण्याची पद्धत लक्षात घेऊन उपक्रमांची निर्मिती केली जाते. त्यामुळे येथे उपक्रम विद्यार्थ्यांवर लादलेले न वाटता त्यांच्या अनुभवातून आणि जिज्ञासेतून विकसित झाल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, तार्किकता, सर्जनशीलता, निरीक्षण, अभिव्यक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, सामाजिक जाणीव आणि प्रामाणिकपणा या जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करण्यावर शाळेचा भर असल्याचे भेटीदरम्यान स्पष्ट झाले.
शिक्षकांच्या कार्याचे कौतुक
या उपक्रमशील कार्याबद्दल मुख्याध्यापक विठ्ठल कदम, श्री.प्रसाद डेगवेकर सर , श्रीम.स्नेहप्रभा वैज मॅडम आणि श्रीम.गीता घोलप मॅडम, श्री. दत्तात्रय कदम सर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. मर्यादित साधनसामग्रीतही कल्पकता, संवेदनशीलता आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनातून शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल शाळेच्या कार्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
“मोठी शाळा उभारण्यासाठी मोठी इमारतच आवश्यक नसते; मोठी दृष्टी आवश्यक असते,” हा संदेश कुणकेरी नंबर १ शाळेच्या कार्यातून अधोरेखित होत आहे. विद्यार्थ्यांच्या अनुभवांना, प्रश्नांना आणि कल्पनांना शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवून कुणकेरी नंबर १ शाळा उद्याचा विचारशील, तर्कशुद्ध, संवेदनशील, प्रामाणिक आणि आत्मविश्वासू नागरिक घडविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.


