आंबोली वाहतूक कोंडीबाबत माजी नगराध्यक्ष साळगांवकर यांची पोलीस निरीक्षक मगदूम यांच्याशी चर्चा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी शनिवार व रविवारी पर्यटकांची होणारी गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांनी उभी केलेली वाहने यामुळे उद्भवणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता धबधब्याच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी उपाययोजना करावी यासाठी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी बुधवारी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन चर्चा केली.
श्री. साळगावकर यांच्या मागणीनुसार आंबोलीत धबधब्यांजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पर्यटक मोठ्या आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत पार्किंग करतात. त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीमध्ये एखाद्या रुग्णाला बेळगाव केएलई हॉस्पिटलला न्यायचे असल्यास मोठी समस्या निर्माण होते. त्याला वेळीच उपचार मिळू शकत नाहीत. त्यामुळे किमान धबधबा परिसरातील पाच किलोमीटरचा रस्ता शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये वाहतूक कोंडी विरहित करण्यासाठी वेगळी उपाय योजना राबवा अशी मागणी साळगावकर यांनी केली.
आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी धबधब्याच्या ठिकाणी सर्पदोष झाल्याने एका पर्यटकांला वाहतूक कोंडीचा फटका बसून वेळीच उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेकडे साळगावकर यांनी पोलिसांचे लक्ष वेधले. मात्र पर्यटकांचा मृत्यू वाहतूक कोंडीमुळे झाला नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांनी दिले. त्या दिवशी मी स्वतः आंबोली येथे उपस्थित होतो. यावेळी मी बेशिस्त पर्यटकांवर १७३ केसेस नोंदवल्या. आम्हाला या दुर्घटनेबाबत कोणीच माहिती दिली नाही. नाहीतर आम्ही ताबडतोब वाहनाची उपलब्धता करून दिली असती असे मगदूम म्हणाले.
श्री मगदूम म्हणाले, यापूर्वी शनिवार व रविवार साठी जिल्हा स्तरावरून आम्हाला शंभर पोलीस स्टाफ मिळत होता. आता त्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. आंबोलीत येणारे पर्यटक हे अति उत्साही तसेच मद्यधुंद असतात. मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्यांना आवरणे पोलिसांनाही थोड्या प्रमाणात कठीण होते. एखाद्या वेळी त्यांच्यावर कारवाईचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केल्यास चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शूटिंग करून ते लगेच प्रसारित केले जाते. त्यामुळे पोलिसांची बदनामी होते. सद्यस्थितीत अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बळावर आंबोली वर्षा पर्यटनाची सुरक्षितता सांभाळावी लागत असल्याचे मगदूम यांनी यांनी सांगितले.
श्री साळगावकर म्हणाले, आंबोली व परिसरातील संबंधित ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन वाहतूक पार्किंग बाबत निर्णय घेतल्यास यावर मार्ग निघू शकतो. यावेळी संबंधित ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याची नाराजी मगदूम यांनी बोलून दाखवली. वनविभागाचे कर्मचारी सुद्धा फक्त धबधब्याच्या परिसरामध्येच तैनात असतात असे ते म्हणाले. होमगार्डचे कर्मचारी वापरण्यासाठी निधीचा प्रश्न येतो. त्यामुळे संपूर्ण आंबोली तसेच चौकुळ आणि गेळ्याच्या पर्यटनावर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवून काळजी घेतली जाते तरीसुद्धा वाहतूक कोंडीबाबत आपण सुचवलेल्या सूचनानुसार योग्य ते नियोजन करून जास्तीत जास्त वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू असे श्री. मगदूम यांनी आश्वासन दिले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, अमोल टेंमकर, माजी नगरसेवक विलास जाधव, अभय पंडित यांनीही काही सूचना केल्या. सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडी संदर्भातही पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांचे लक्ष वेधण्यात आले असता, शहरातील वाहतूक कोंडी संदर्भात पालिका प्रशासनाकडून नियमावली आखण्यात येत आहे. ही नियमावली पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यानुसार शहरातील वाहतूक कोंडीवर काम करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी ट्रक मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष बावतीत फर्नांडिस, डुमिंग अलमेडा, गौरव जाधव, संतोष तळवणकर, संदीप नाईक, शिवा गावडे, शुभम मलकाचे उपस्थित होते.


