न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दोडामार्गनंतर सावंतवाडीत उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नांवर आमसभेत धुमशान

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील समस्या आणि ढिसाळ आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्यावर आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आमसभा चांगलीच तापली. आमसभेत आरोग्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. तर आमदार केसरकर यांनी शासनाकडून आरोग्य व्यवस्थेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देत परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, असा विश्वास दिला.

आमसभेत आरोग्य कृती समितीचे एन. बी. रेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडला. रुग्णालयातील मंजूर आकृतिबंधापैकी केवळ ३ डॉक्टर सध्या कार्यरत असून उर्वरित रिक्त पदांबाबत नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार न करता केवळ पुढे रेफर करण्याचे काम होत असून खासगी लोकांचे धंदे मोठे करण्याचा शासनाचा उद्देश आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकारकडे पैसे नसतील तर आम्ही ‘भीक मागो’ आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

यावर आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने रोख लावत ‘ही बोलण्याची योग्य पद्धत नाही,’ अशा शब्दांत रेडकर यांना सुनावले. पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, आरोग्यमंत्री रिक्त पदे भरण्याचे आश्वासन देत असून आरोग्य व्यवस्थेसाठी पैसेही मंजूर केले आहेत. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निधी आला असून टेंडरही काढण्यात आले आहे. मात्र केवळ जागेच्या अडचणीमुळे विलंब झाला आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे ८५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून ते लवकरच प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले जाईल. याशिवाय सावंतवाडीत आयुषची ओपीडी सुरू होत असून वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथील रुग्णालयांची कामे प्रगतीपथावर असल्याचे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माजी नगराध्यक्ष संजू परब, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेचे सदस्य व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे