झोया मरीन’ बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग।/ राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘ झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ‘ च्या जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० बोटी बनवण्याचे काम तळवणे गावात होणार आहे. यामुळे स्थानिक २०० युवक-युवतींना याच भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची ही मुहूर्तमेढ आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली, झोया मरीनचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवारीया, डॉ. निलेश बाणवलीकर, युवराज लखमराजे भोंसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक,जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शर्वाणी गावकर, माजी उप सभापती संदीप नेमळेकर, पंचायत समिती सदस्या स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शेखर गावकर, सिद्धेश कांबळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, तळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचे काम नारायण राणेंनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हे स्वप्न काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचे काम पालकमंत्री म्हणून मी सुरू केले आहे.
रिव्हर्स माइग्रेशनची ही सुरूवात असून आरोंदा जेटी व रेडी बंदर तसेच ताज पंचतारांकित प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागणार आहेत. आता विरोधाला थारा न देता येथील लोकांनी विकासाची सवय लावून विकासाला साथ द्यावी, असे आवाहन यांनी केले.
राज्यात काहीजण या जिल्ह्याबद्दल काहीही माहिती नसताना जमीन व्यवहारावरून जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांना उत्तर देत न बसता कामातून उत्तर देण्याचा निश्चय मी केला आहे. खा. नारायण राणे यांनी अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले. त्यातील चिपी विमानतळ, मुंबई गोवा महामार्ग यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले तर सी वर्ल्ड व अन्य प्रकल्प विरोधासाठी विरोध झाल्याने अपूर्ण राहिले. त्यामुळे जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हाच येथील लोकांसाठी जिल्ह्यातच रोजगार उत्पन्न करून देण्याचा निर्धार केला. आतापर्यंत आपली मूले गोव्यात जात होती. मात्र, आज गोव्यातील कंपनी महाराष्ट्रात आणण्याचे काम आम्ही केल आहे. गोवा, कर्नाटकपेक्षा मोठी गुंतवणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्याचा शब्द त्यांनी दिला असून महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असा विश्वास श्री. राणे यांनी व्यक्त केला.
मुंबईतील वॉटर मेट्रो या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी बोटी बनवण्याचे काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. कारखाना उभारणीनंतर दीड ते दोन महिन्यात पहिली बोट तयार होणार असून २०० स्थानिक तरूण-तरूणींना रोजगार देण्याच काम इथे होणार आहे. कुशल कामगारांबरोबरच अकुशल कारागीर बनविण्यासाठी येथील युवकांना ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे युवापिढीने आता भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
आरोंदा जेटीच्या उद्घाटनासाठी लवकरच सर्वांना याव लागणार आहे. त्यामुळे पर्यटन, जलवाहतूकीची दालन खुली होणार आहेत. खासदार नारायण राणे यांनी काही वर्षांपूर्वी सुरुवात केलेले व सद्यस्थितीत बंद असलेलं रेडी बंदर सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेतला असून १०० टक्के क्षमतेवर ते सुरु करण्याचा विश्वास यानिमित्ताने देतो. तसेच देवगड बंदर देखील सुरू होणार असून जिल्ह्यातील दोन टोकावरील या बंदरांमुळे गुजरातप्रमाणे इथलाही विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या झोया मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जॉन फर्नांडिस,
सुरज देवारीया तसेच प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे डॉ. निलेश बाणावलीकर यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली यांनी मनोगत व्यक्त केली. माजी सभापती संदीप नेमळेकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात प्रकल्प आणल्याबद्दल ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे संचालक जॉन फर्नांडिस यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पवार यांनी तर आभार मेरिटाईम बोर्डचे अधिक्षक अभियंता श्री. देवरे यांनी आभार मानले.


