न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांचा सुधारित भूसंपादन प्रस्ताव सोमवारी सादर करा: पालकमंत्र्यांचे निर्देश

 

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर

      कणकवली तालुक्यातील हळवल येथील कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी बदललेल्या नियमांनुसार आणि नवीन तरतुदींनुसार भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव येत्या सोमवारी सादर करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कार्यकारी अभियंता श्री. बागुल, पूजा इंगवले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

हळवल येथे कोकण रेल्वे मार्गावर मुख्य उड्डाणपुलाचे बांधकाम होऊन १२ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूंचे जोडरस्ते आणि आवश्यक भूसंपादन न झाल्यामुळे हा पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही. यामुळे हळवल, कळसुली, शिवडाव, कसवण, तळवडे, आंब्रड, पोखरण आदी गावांतील ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना वारंवार बंद होणाऱ्या रेल्वे फाटकामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

 

या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी या कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. भूसंपादनातील तांत्रिक अडचणी, बाधित जागामालकांना द्यावयाचा मोबदला आणि वाढीव खर्च यावर सविस्तर चर्चा झाली. नव्या बदलानुसार व सध्याच्या निकषांनुसार परिपूर्ण असा सुधारित भूसंपादन प्रस्ताव येत्या सोमवारी तात्काळ सादर करावा, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नवीन अलाइनमेंट नुसार किती जमीनधारक बाधित होणार याची यादी करून मोजणी प्रक्रिया आणि थेट खरेदी बाबत प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक नियोजन प्रस्तावात समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या.

हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर आवश्यक निधी मंजूर करून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि जोडरस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करून हा उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे