न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोकणातील रानभाज्या ही आपल्या निसर्गाची अमूल्य देणगी: युवा नेते विशाल परब 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

     कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या असंख्य रानभाज्यांना आता स्थानिक चुलीपासून देश-विदेशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची नवी दिशा मिळताना दिसत आहे. पारंपरिक खाद्यसंस्कृती, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि कोकणातील महिलांच्या पाककलेचा अनोखा संगम असलेल्या इन्सुली येथील रानभाज्या महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या महोत्सवात शेकडो प्रकारच्या रानभाज्या तसेच विविध पारंपरिक पाककृतींचे दर्शन घडले. महिलांनी आपल्या पारंपरिक पाककौशल्यातून विविध पदार्थ बनविले होते. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आर्थिक आणि व्यावसायिक संधी मिळण्याची नवी वाटही खुली झाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका विशाल परब यांनी महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम भविष्यात सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रासह देशभर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, “कोकणच्या मातीत निसर्गाने आपल्याला अतिशय समृद्ध अशी रानभाज्यांची परंपरा दिली आहे. या रानभाज्या केवळ आपल्या घरातील स्वयंपाकघरापुरत्या मर्यादित न राहता त्यांना व्यापक ओळख मिळाली पाहिजे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे.”

“महिलांच्या हातातील पारंपरिक पाककलेला योग्य व्यासपीठ, प्रशिक्षण, आधुनिक पॅकेजिंग आणि बाजारपेठ मिळाली, तर अनेक महिला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात. हा उपक्रम भविष्यात महाराष्ट्रासह देशातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कोकणातील रानभाज्यांकडे केवळ पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणून न पाहता त्यामध्ये मोठी आर्थिक, व्यावसायिक आणि निर्यातीची क्षमता असल्याचे भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांनी सांगितले.

ते म्हणाले, “कोकणातील रानभाज्या ही आपल्या निसर्गाची अमूल्य देणगी आहे. या भाज्यांचे योग्य संशोधन, दस्तऐवजीकरण, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि मार्केटिंग झाले, तर या नैसर्गिक संपत्तीला देश-विदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते.”

“आज जगभरात नैसर्गिक, पारंपरिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. त्यामुळे कोकणातील रानभाज्यांसाठी ही योग्य संधी आहे. गावातील महिलांच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि डिजिटल मार्केटिंगची जोड दिल्यास मोठे उद्योग उभे राहू शकतात. यातून महिलांना रोजगार, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि कोकणच्या खाद्यसंस्कृतीला देश-विदेशात ओळख मिळू शकते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडीत आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या रानभाज्या महोत्सवाला डॉ. विजय दळवी – सहयोगी अधिष्ठाता, श्री. नितीन एकनाथ राऊळ – जिल्हा परिषद सदस्य, इन्सुली, श्री. सदाशिव विठ्ठल राणे – पंचायत समिती सदस्य, श्री. महेश शिवाजी सावंत – अध्यक्ष, विद्या विकास मंडळ, इन्सुली तसेच श्री. सचिन दळवी – उपाध्यक्ष, विद्या विकास मंडळ, इन्सुली, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोरगावकर, महेंद्र पालव, साईनाथ राणे, मुख्याध्यापक शेवाळे सर, अजय कोठावळे, सौ. पालव उपस्थिती होते. सुत्रसंचालन सौ. गौरवी पेडणेकर व शुभम धुरी यांनी केले. डॉ. विजय दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे