ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गच्या वाहनांना स्वतंत्र लेन, पालकमंत्री राणे यांचे मनसेकडून आभार
सिंधुदुर्ग/राजू तावडे
ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग जिल्हा पासिंगच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन ठेवल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा मनसेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. याबाबत मनसेने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. हि लेन तात्पुरती न राहता कायमस्वरूपी राहील अशी अपेक्षा सिंधुदुर्ग मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग जिल्हा पासिंग असलेल्या व्यावसायिक सोडून अन्य सर्व वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी जिल्हावासियांनी जो टोलमाफीचा शब्द दिला होता तो शब्द पाळला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्र्यांचे जाहीर आभार मानण्यात आले. या मार्गावरून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहने रोज प्रवास करणार आहेत. त्यामुळे जिल्हावासियांनी व मनसेतर्फे केलेली टोलमुक्तीची मागणी अतिशय रास्त होती. या मागणीला पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रतिसाद दिला व आपल्या जिल्ह्यासाठी टोलनाक्याच्या दोन्ही दिशेला स्वतंत्र मार्गिका ठेवली आहॆ. या टोलनाक्यावर आता जिल्हावासियांसाठी ज्या स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात आलेल्या आहेत त्या तात्पुरत्या न राहता कायमस्वरूपी राहतील अशी अपेक्षा आहॆ. अन्यथा एकदा टोलनाका सुरू झाला की नंतर या मार्गिका बंद करून जिल्हावासियांच्या तोंडाला पाने फुसण्याचा प्रकार घडल्यास संघर्ष करावा लागेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहॆ.


