लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, माडखोल येथे युवतीची आत्महत्या
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धवडकी (बेबीवाडी) येथे युवतीने आत्महत्या केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याने, मानसिक तणावातून या २५ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मागील काही दिवसापूर्वी घडल्याचे समजते.
या प्रकरणातील आरोपी सनिकेत सतीश पाटील (वय २६, रा. कापूरखेड, ता. वाळवा, जि. सांगली) याने फसवणूक केल्यानंतर पीडित युवतीने राहत्या घरी सीलिंग फॅनला गळफास घेतला. स्वतःवर संशय येऊ नये म्हणून आरोपीने कोणालाही न कळवता तिला गळफासावरून उतरवून रुग्णालयात नेले होते.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात पीडितेचे वडील सागर मांगले (रा. लाकूडवाडी, ता. आजरा) यांच्या तक्रारीवरून आज सोमवारी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक अधिक तपास करत असून पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आरोपीवर अटकेची कारवाई सुरू करण्यात आली आहे.


