न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी टर्मिनसवर मोकळ्या जागेत इमारतीचा घाट, सावंतवाडी टर्मिनस केवळ कागदावरच?

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ लगतची मोकळी जागा ही भविष्यातील चौथी लूप लाईन, अतिरिक्त प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि स्टेबलिंग लाईन (गाड्या उभ्या करण्यासाठीचा ट्रॅक) टाकण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या एकमेव उपलब्ध व योग्य जागा आहे. मात्र, महामंडळाने या मोकळ्या जागेतच टर्मिनस इमारतीचे बांधकाम प्रस्तावित केले आहे. येथे सिमेंट-काँक्रीटची इमारत उभी राहिली, तर स्थानकाच्या या बाजूचा रेल्वे विस्तार कायमस्वरूपी बंदिस्त होईल. भविष्यात येथे एकही फलाट होणार नाही. या बाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत प्रस्तावित बांधकामाला तातडीने स्थगिती देण्याची मागणी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या हक्कासाठी मंजूर झालेले ‘लोकमान्य प्रा. मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ प्रत्यक्षात साकारण्याआधीच कोकण रेल्वे प्रशासनाच्या अदूरदर्शी आणि अजब कारभार समोर आला आहे. अतिरिक्त फलाटांचा विस्तार करण्याऐवजी, त्यासाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागेतच प्रशासकीय इमारतीचे उभारण्याचा घाट कोकण रेल्वेने घातला आहे. प्रशासनाच्या या नियोजनामुळे भविष्यात सावंतवाडी टर्मिनस केवळ नावापुरतेच उरेल, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

टर्मिनस म्हणजे केवळ प्रवाशांना आकर्षित करणारी चकचकीत इमारत नव्हे, तर गाड्या थांबवणे, वळवणे, त्यांची देखभाल करणे आणि क्रॉसिंग सुरळीत चालवण्यासाठी लागणारी ‘लाईन कपॅसिटी’ असते. अतिरिक्त लूप लाईन आणि प्लॅटफॉर्मच नसतील, तर सावंतवाडीतून नव्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे आणि त्यांचे रॅक उभे करणे अशक्य होईल. यामुळे गाड्यांची नियमित वॉशिंग, अंतर्गत स्वच्छता आणि तांत्रिक तपासणीसाठी जागाच शिल्लक राहणार नाही.

सध्या सावंतवाडीतून धावणारी ‘तुतारी एक्सप्रेस’ आणि ‘सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस’ या गाड्यांसाठी सावंतवाडीत देखभाल व स्टेबलिंगची पुरेशी जागा उपलब्ध नाही, ही तांत्रिक अडचण पुढे करून सावंतवाडीच्या हक्काच्या गाड्या पुन्हा मडगाव (गोवा) किंवा इतरत्र वळवण्याचा हा पूर्वनियोजित डाव असावा असा संशय आता प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.

माजी शालेय शिक्षण मंत्री व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर ‘रेल हॉटेल’ उभारण्याची संकल्पना मांडली होती. परंतु, रेल्वेच्या मूळ टर्मिनस यार्डचाच बळी देऊन जर इमारतीचे काम रेटले गेले, तर ही ‘रेल हॉटेल’ची घोषणाही केवळ कागदावरच उरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

ट्रॅकच्या जागेत इमारतीचे बांधकाम करून कोकण रेल्वे टर्मिनसचा मूळ हेतूच मारून टाकत आहे. प्रशासनाने ही जागा केवळ रुळांसाठी आरक्षित ठेवून इमारतीसाठी पर्यायी जागा शोधावी. प्रवासी संघटनांना विश्वासात घेऊन सुधारित यार्ड आराखडा जाहीर न केल्यास कोकणातील जनतेला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांनी दिला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ समोरील मोकळ्या जागेतील प्रस्तावित इमारत बांधकामाला त्वरित ‘स्थगिती’ द्या. सदर मोकळी जागा केवळ नवीन लूप लाईन, अतिरिक्त प्लॅटफॉर्म व स्टेबलिंग लाईनसाठीच आरक्षित ठेवा. ट्रॅक विस्तारात अडथळा ठरणार नाही अशा पर्यायी जागेत इमारतीचे बांधकाम करून सुधारित यार्ड आराखडा (Revised Yard Plan) तातडीने जाहीर करा, अशा मागण्यांचे निवेदन सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, मार्गदर्शक अभिमन्यू लोंढे, नितीन गावडे व रिक्षा युनियनचे पदाधिकारी, प्रवासी यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे