सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया: विशाल परब
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया. असे आवाहन भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी नागरी कृती समितीच्या कार्यक्रमप्रसंगी केले.
गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवारी सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
‘श्री गणेशोत्सव २०२६’ निमित्त आयोजित या सन्मान सोहळ्याला भाजपा युवा नेते विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जि. प. सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर, उपाध्यक्ष ॲड. राजू कासकर, सरचिटणीस श्रीपाद सावंत, नगरसेविका दिपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन नाईक, माजी नगरसेवक कीर्ती बोंद्रे, नगरसेवक अजय गोंदावळे, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष बापू सावन, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, माजी नगरसेवक उमाकांत वारंग आणि नगरसेविका दिव्या सूर्याजी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणेश मूर्तिकार, भजनी मंडळांचे कलाकार, गायक, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, डेकोरेटर्स तसेच गणेशोत्सवाची शोभा वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध घटकांचा सन्मान करण्यात आला.
विशाल परब पुढे म्हणाले, गणेशोत्सवाच्या भव्यतेमागे अनेक हातांचे कष्ट, भक्ती आणि समर्पण दडलेले असते. या सेवाव्रतींचा सन्मान करून सावंतवाडी नागरी कृती समितीने त्यांच्या पाठीवर कौतुकाची आणि शाबासकीची थाप दिली आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.
गणेशोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी मूर्तिकारांपासून सफाई कामगारांपर्यंत असंख्य हात निःस्वार्थपणे झटत असतात. अशा सेवाव्रतींचा सन्मान म्हणजे त्यांच्या कष्टांना आणि समर्पणाला केलेला मानाचा मुजरा आहे. या पडद्यामागील खऱ्या शिलेदारांना प्रकाशझोतात आणण्याचे काम सावंतवाडी नागरी कृती समितीने केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर, उपाध्यक्ष ॲड. राजू कासकर, सरचिटणीस श्रीपाद सावंत तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


