न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ५० पेक्षा अधिक कच्चे बंधारे आणि महाआरोग्य शिबिरांचा महासंकल्प

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले. यावेळी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. त्याच उपक्रमशीलतेचा पुढील टप्पा म्हणून भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १७ महाआरोग्य शिबिरे आणि लोक सहभागातून ५० पेक्षा अधिक कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

वाढदिवस म्हटला की शुभेच्छांचा वर्षाव, सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट… मात्र या पारंपरिक चौकटीला छेद देत ‘ना बुके, ना पोस्टर; बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान!’ असा संदेश देत भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोग्यसेवा आणि जलसंधारणाला प्राधान्य देणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबरपासून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कच्चे बंधारे उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते स्थानिक पातळीवर अडविणे, भूजलपातळी टिकविणे आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या उद्देशाने ५० पेक्षा अधिक कच्चे बंधारे उभारण्याचे नियोजन आहे.

या उपक्रमात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह स्थानिक युवक आणि सेवाभावी संस्थांचाही सहभाग राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी अल्पावधीत पाणी वाहून जाण्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्त्व आहे.

जलसंधारणाबरोबरच ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान तीन शहरे आणि विविध जिल्हा परिषद मतदारसंघांत १७ महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची विविध आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही शिबिरे महत्त्वाची ठरणार आहेत.

वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी विधायक काम उभे करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे