ठाकरे बंधूंच्या मोर्चा बाबत मंत्री नितेश राणे यांना पोटशूळ का? मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
ठाकरे बंधूंचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध असताना मंत्री नितेश राणे यांना पोटशूळ का उठलाय असा सवाल मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे. अलीकडच्या काळात हिंदुत्वाची झुल पांघरलेल्या व ती झुल घेवून संपूर्ण राज्यात फिरणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हिंदुत्व शिकवू नये. ठाकरे हे वाऱ्याची दिशा बघून आपली हिंदुत्वाची भूमिका बदलणारे हिंदुत्व नाही तर ते धगधगते हिंदुत्व आहे. याचा अनुभव राज्याने अनेक वेळा घेतला आहे. मुंबई मध्ये जेव्हा आपल्या पोलिस भगिनींवर रझा अकादमीच्या गुंडांनी हल्ला केला होता व कपड्यांना हात घातला होता. या मोर्चाने मुंबईमध्ये दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा राज ठाकरे हेच रस्त्यावर उतरले होते व त्याविरुद्ध प्रचंड मोर्चा काढला होता. तेव्हा नितेश राणे का शांत होते? का हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरले नाहीत? याच उत्तर त्यांनी जनतेला देणे आवश्यक आहे. असे श्री. केसरकर यांनी म्हटले आहे.
राहता राहिला विषय मुंबईत उदया सकाळी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचा तर उदया आयोजित करण्यात आलेला ठाकरे बंधूंचा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध असताना नितेश राणे यांना या मोर्चाला हरकत घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. उलट सत्ताधारी मंडळींच्या अंगात चोरी नसेल तर सत्ताधारी मंडळींनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केले आहे.


