न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सांस्कृतिक चळवळ म्हणजे आपल्यातील ऊर्जेला योग्य मार्ग: प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर

सिंधुदुर्ग  /  राजू तावडे 

  “सांस्कृतिक चळवळ म्हणजे आपल्यातील ऊर्जेला योग्य मार्ग मिळवून देणे होय. सम्राट क्लबच्या माध्यमातून ही चळवळ अधिक बहरत जावो.” असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांनी केले. सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट वनच्या अध्यक्षपदी ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष म्हणून सौ. राजश्री खांडेपारकर यांचा पदग्रहण सोहळा नुकताच गोव्यात संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर बोलत होते. 

या प्रसंगी सम्राट क्लब इंटरनॅशनलचे मावळते अध्यक्ष सम्राट ॲड. अवधूत सलत्री, अध्यक्ष सम्राट सागर पानवेलकर, राज्य १ चे मावळते अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी, नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. राजश्री खांडेपारकर आणि सचिव सम्राट विनोद व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘समई नृत्या’ने झाली.

नाना पाटेकर पुढे म्हणाले “सुलभा देशपांडे, अरविंद दंडवते, विजय तेंडुलकर, विजयाबाई व माधव वाटवे यांच्यासोबत ‘रंगायन’मध्ये काम करताना खूप शिकायला मिळाले. सुरुवातीला एकाच वेळी तीन एकांकिकांमध्ये मी नोकर म्हणून काम केले आहे. त्यावेळी माझ्यात असलेली भूक आणि अपमान या दोन मित्रांनीच मला खऱ्या अर्थाने अभिनय शिकवला. मी कधीही अभिनयाच्या शाळेत गेलो नाही. ज्या भाषेत आपल्याला स्वप्ने पडतात ती आपली खरी भाषा. माझी भाषा मराठी आहे, मात्र हल्ली मला कोकणीतही स्वप्ने पडू लागली आहेत,” अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “मी शेतकर्‍यांसाठी केलेले काम कुठल्याही स्वार्थाने केलेले नाही. आज माझ्या सातबारावर स्वतःची जमीन नसली, तर जमिनीने मोजता येणार नाहीत एवढी माणसे माझ्यासोबत आहेत.” यावेळी त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या जिद्दीचे कौतुक करताना, पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः नाकात ऑक्सिजन सिलेंडर घालून थेट स्पॉटवर पोहोचल्याची आठवण सांगून त्यांना आदरांजली वाहिली.

आपल्या मनोगतात नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. राजश्री खांडेपारकर म्हणाल्या, “वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या स्थलांतरामुळे लोकसंख्येच्या रचनेत आणि समाजरचनेत नकळत बदल घडून येतात. त्यामुळे आपली संस्कृती आणि अस्तित्व धोक्यात येईल की काय, अशी भीती स्थानिकांच्या मनात निर्माण होते. अशा काळात व्यापक दृष्टिकोनातून विकासाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे असून विकासाला विरोध करण्याऐवजी सांस्कृतिक मूल्ये व जीवनमूल्ये जपून समतोल राखणे आवश्यक आहे. ‘विश्व मानवाच्या सांस्कृतिक मैत्रीचा अनुबंध’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत सम्राट क्लबच्या माध्यमातून कला आणि समृद्ध संस्कृतीचे जतन करण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत.”

त्या पुढे म्हणाल्या, “महाराष्ट्रात सम्राट क्लबच्या विस्तार कार्यक्रमाला तेथील सरकारचा पाठिंबा व सहकार्य मिळावे, जेणेकरून दोन्ही राज्यांतील लोकसंस्कृतीचे जतन आणि आदानप्रदान करणे सुलभ होईल. ५२ वर्षे सातत्याने चालणाऱ्या या सांस्कृतिक चळवळीला पाठिंबा देणाऱ्या सर्व सम्राट शुभेच्छुकांचे मी आभार मानते.”

या कार्यक्रमाला गोव्याचे माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलब, गोविंद गावडे, रमेश तवडकर, संस्थापक अध्यक्ष दिवाकर शिक्रे, सुधाकर नागवेकर, अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, गोवा राज्यातील ३४ सम्राट क्लबचे अध्यक्ष, मये अध्यक्ष नरेश पेडणेकर, सावंतवाडी टाऊन अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, मालवणी कवी दादा मडकईकर, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सुनील राऊळ, ॲड. सिद्धी परब, डॉ. सोनल लेले, स्मिता केंकरे, श्रुती सावंत तसेच पदाधिकारी सम्राट सदस्य आणि निमंत्रित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे