न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कसाल येथे १ नोव्हेंबरला जिल्हावासियांचे पहिले ‘घुंगुरकाठी’ साहित्य संमेलन

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्यावतीने कसाल येथे सिंधुदुर्गवासियांचा दिवसभराचा साहित्यिक जागर होणार आहे. कसाल हायस्कुल येथे रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी ‘पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन’ जिल्ह्यातील ५० साहित्यिक, कवी यांच्या उपस्थितीत रंगणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर, उद्घाटकपदी रंगकर्मी, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांना निमंत्रित केले आहे. अध्यक्ष, उद्घाटकांपासून ते निवेदकापर्यंत सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असतील, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. सई लळीत उपस्थित होत्या. श्री. लळीत म्हणाले की, या संमेलनात व्यासपीठावर फक्त जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, अभ्यासक, कलाकार यांचा वावर असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक परंपरा उज्ज्वल आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरुन कोणीही आयात न करता हे संमेलन पूर्णपणे सिंधुदुर्गवासियांचे राहील, असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. संमेलन सर्व रसिकांना खुले आहे. दिवसभराच्या या संमेलनात उद्घाटनसत्र, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, काव्यरंग, खुले कवीसंमेलन आणि निमंत्रितांचे कवीसंमेलन अशी सात सत्रे असतील. हे संमेलन न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय (कसाल हायस्कुल), कसाल यांच्या सहकार्याने होत आहे. स्वागताध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष अवधुत मालणकर यांची निवड करण्यात आली आहे.

मोबाईलचा वाढता वापर, वाचनाचे कमी झालेले प्रमाण लक्षात घेऊन रसिकांना पुन्हा साहित्याकडे वळविण्याच्या उद्देशाने ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्यावतीने जानेवारी २०२५ मध्ये ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाची स्थापना ओरोस येथे केली. या व्यासपीठाच्यावतीने ओरोस येथे आतापर्यंत सलग 19 मासिक साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून दिवसभराचे साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेतला, असे श्री. लळीत यांनी सांगितले.

संमेलनाचा आरंभ लोककलेच्या आविष्काराने आगळ्यावेगळ्या पद्धतीने होईल, असे सांगून श्री. लळीत म्हणाले की, सकाळी १० वाजता ग्रंथपूजनाने संमेलनाचे उद्घाटन होईल. उद्घाटन सत्रात स्वागताध्यक्ष अवधुत मालणकर, प्रमुख पाहुणे प्रा. प्रवीण बांदेकर, उद्घाटक श्रीनिवास नार्वेकर, अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांची भाषणे होतील. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘मालवणी मुलखातील लोकसाहित्य’ यावर परिसंवाद होईल. यात लेखिका उषा परब (लोककथा, दंतकथा), कवी अजय कांडर (ओव्या, फुगडीगीते, लोकगीते), अभ्यासक जी. ए. सावंत (उखाणे, कोडी, हुमाणी) आणि सदाशिव गावकर, कुसबे (म्हणी, वाक्प्रचार) सहभागी होतील.

कथाकथनाचे तिसरे सत्र लेखिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात लेखिका वैशाली पंडित, कवी भाऊसाहेब गोसावी सहभाग घेतील. भोजनोत्तर चवथ्या सत्रात दशावतारातील भीष्माचार्य श्री. यशवंतकाका तेंडोलकर यांची प्रकट मुलाखत होईल. मालवणी बोलीचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि ‘मराठी आठव दिवस’ उपक्रमाचे संकल्पक पत्रकार रजनीश राणे ही मुलाखत घेतील. ‘काव्यरंग’ या मालवणी कवितांच्या नाट्याविष्काराच्या पाचव्या सत्रात अभिनेते अभय खडपकर आणि निलेश पवार, सिद्धी वरवडेकर हे डॉ. सई लळीत यांच्या दोन मालवणी कविता अभिनीत करतील.

सहावे सत्र निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे असेल. या कवीसंमेलनात संध्या तांबे, रुजारिओ पिंटो, डॉ. सई लळीत, विठ्ठल कदम, सरिता पवार, निलेश गावकर, कल्पना मलये सहभागी असतील. सातव्या सत्रातील खुल्या कविसंमेलनाने या साहित्य संमेलनाचा समारोप होईल. या खुल्या कवीसंमेलनात संमेलनस्थळी नोंदणी केलेल्या कवी, कवयित्रींचा सहभाग असेल. संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व अभिनेते निलेश पवार करणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे