काणेकर कुटुंबीयांतर्फे कोजागिरी पौर्णिमा निमित्त रविवारी श्री साईबाबांचा उत्सव
सिंधुदुर्ग / राजू तावडे
बांदा येथील काणेकर कुटुंबीयांतर्फे यंदाही कोजागिरी पौर्णिमा निमित्त श्री साईबाबांचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जाणार आहे. यंदा या उत्सवाला ७३ वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या उत्सवाची सुरुवात सकाळी १० वाजता श्री साईबाबांच्या महापूजेने होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद आणि संध्याकाळी ४ वाजेपासून तीर्थप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण रात्री ९ वाजल्यापासून सुरू होणारे सांस्कृतिक व भजनाचे कार्यक्रम असणार आहेत. पहिले सत्र (रात्री ९ वाजता): गोव्यातील नामवंत भजनी कलाकार श्री. पांडुरंग राऊळ, श्री. विठ्ठल शिरोडकर आणि श्री. प्रल्हाद गवस यांचा पारंपरिक भजनाचा कार्यक्रम होईल. त्यांना श्री. प्रसाद गावस, श्री. अमोल गावस, श्री. मिलिंद परब, श्री. केदार फडते, श्री. मोहन पेडणेकर आणि श्री. जिग्नेश पेडणेकर यांची साथसंगत लाभेल.
दुसरे सत्र (रात्री ११ वाजता): पं. अजय पोहनकर यांचे शिष्य श्री. धनंजय जोशी (नांदेड) यांचा शास्त्रीय अभंगवाणी व नाट्यसंगीत गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना पं. तुळशीदास नावेलकर (तबल) आणि श्री. प्रसाद गावस (संवादिनी) साथसंगत करतील.
तिसरे सत्र (रात्री १:३० वाजता): पं. प्रभाकर कारेकर यांचे शिष्य श्री. संदेश खेडेकर (गोवा) यांचा शास्त्रीय संगीत, अभंगवाणी व नाट्यसंगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यांना श्री. मिलिंद परब (तबल) आणि श्री. सुनाद कोरगावकर (संवादिनी) साथसंगत करतील.
शेवटच्या सत्रात सोमवारी पहाटे ५:०० वाजता महाआरतीसह संपूर्ण उत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी आणि नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून या उत्सवाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन काणेकर कुटुंबियांतर्फे करण्यात आले आहे.


