उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचा उपोषणाचा इशारा …. प्रशासनास दोन दिवसांची मुदत
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यां संदर्भात 24 जानेवारी पर्यंत ठोस लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मिळाले तरच उपोषणाचा फेरविचार होईल. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 26 जानेवारीला नाईलाजाने उपोषणास बसावे लागेल, असा इशारा सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीने दिला.
कृती समितीच्या शिष्टमंडळास रुग्णालय प्रशासनाने गुरुवार दिनांक 22 जानेवारीला सायंकाळी चर्चेसाठी निमंत्रीत केले. वैद्यकीय अधिक्षक रजेवर असल्याने प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीषकुमार चौगुले यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. कागदोपत्री सावंतवाडीत उप जिल्हा रुग्णालयात 34 डॉक्टर आहेत. प्रत्यक्षात कित्येक पदे रिक्त आहेत. अभिनव फाऊंडेशनच्या जनहित याचिका प्रकरणी सर्किट बेंच कोल्हापूर यांनी पाहणीसाठी समिती गठीत केली. त्या समितीने पाहणी करून अहवाल दिला. मात्र तब्बल तीन ते चार महिने झाले तरी समितीच्या अहवालावर कार्यवाही झालेली नाही.
स्वतः आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी पाहणी करुन वरच्या मजल्या वरील एका खोलीत जिथे भंगार सामान भरले आहे; ती खोली रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपसंचालकांच्या सूचनांचेही पालन झालेले नाही. ही खोली रिकामी करुन त्या ठिकाणी 20 रुग्णांचा एक वॉर्ड होऊ शकेल, अशा सूचना उपसंचालकांनी दिल्या होत्या. मात्र त्याचेही कार्यवाही केली नाही.
M.D.फिजिशियन उपलब्ध करुन द्यावेत. दोन भुलतज्ञ कायम स्वरूपी मिळालेत. रक्तपेढीची स्टोअरेज क्षमता 400 रक्त बँग करावी, ट्रामा केअर युनिट कार्यरत करावेत, रेडिओलाँजिस्ट उपलब्ध करुन द्यावेत. रुग्णालयातील लिफ्ट सुरु करावी, कंत्राटी कर्मचारी यांची सही प्रत्यक्ष ज्या पगारावर घेतली जाते; तेच वेतन त्यांना अदा करावे आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत एन.बी.रेडकर, कृती समितीचे रविंद्र ओगले, राजू केळुसकर, अँड.नंदन वेंगुर्लेकर, मल्टीस्पेशालिटी जागा मालक रविंद्र केरकर, माडखोल माजी सरपंच संजय लाड, रुग्ण कल्याण समिती सदस्य रवी जाधव, सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे, भाऊ पाटील, अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर,संगीत कलाकार चंद्रकांत घाटे, आर.एम.शिंदे, ए.के. गायकवाड आदी उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी मोबाईल वर डॉ. चौगुले यांचे मार्फत शिष्टमंडळाशी चर्चा केली.


