महाराष्ट्र एका कर्तबगार नेत्याला मुकला…. प्रवीण भोसलेंची अजित पवार यांना श्रद्धांजली
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्तबगार नेते होते. महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका कर्तबगार नेत्याला मुकला आहे अशा शब्दात अजित पवार यांचे एकेकाळचे सहकारी तथा कौटुंबिक स्नेही माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. माझ्या मित्राला मी गमावले आहे याचे मला मोठे दुःख होत आहे, असे श्री. भोसले म्हणाले.
विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले हे वृत्त आम्हाला क्लेशदायक असेच आहे. अजित पवार हे माझे सहकारी आणि कौटुंबिक स्नेही होते. शरद पवार आणि माझ्या मधला ते दुवा होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात त्यांचा मोठा वाटा होता. ते कर्तबगार नेते आणि विकास पुरुष होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातही त्यांचा वाटा होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी ओरोस येथे उभारण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिले होते. मी राजकारणात कायम टिकावे यासाठी त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी मला भावाप्रमाणे साथ दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची त्यांची क्षमता होती आणि ते नक्कीच मुख्यमंत्री बनणार होते, परंतु काळाने त्यांच्यावर दुर्दैवी घाला घातला. त्यांचे निधन दुःखदायक असेच आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशीच प्रार्थना परमेश्वराकडे व्यक्त करतो. असे श्री. प्रवीण भोसले म्हणाले.


