माजगाव मतदारसंघात विक्रांत सावंत यांचा झंझावाती प्रचार …..मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग| राजू तावडे
“आजोबा आणि वडिलांनी या भागाच्या विकासासाठी जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी भावना माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केली. माजगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. या मतदारसंघात ‘सावंत’ विरुद्ध ‘इतर’ असा सामना असून या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचा वारसा घेऊन त्यांची तिसरी पिढी आता निवडणूक रिंगणात उतरली आहे. माजी जिल्हा परिषद सभापती कै. विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांनी या मतदारसंघातून शड्डू ठोकला असून, त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
कोकणच्या राजकारणात कै. भाईसाहेब सावंत यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा विकासकामांचा आणि जनसंपर्काचा वारसा विकास सावंत यांनी पुढे चालवला होता. आता हीच परंपरा कायम राखण्यासाठी विक्रांत सावंत सक्रिय झाले आहेत. मतदारसंघातील तरुण चेहरा आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून विक्रांत सावंत यांनी मतदारसंघातील गावोगावी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. सध्या माजगाव, चराठे, ओटवणे, सोनुर्ली आणि वेत्ये या प्रमुख पट्ट्यांमध्ये त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.. घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे आबालवृद्ध ,तरुणांचा मोठा ओढा त्यांच्याकडे दिसून येत आहे.सावंत घराण्याशी असलेले जुने ऋणानुबंध जागवत ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


