विक्रांत सावंत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा….. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सिंधुदुर्ग /राजू तावडे
माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले विक्रांत सावंत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. साळगावकर यांनी जिल्हा परिषद माजगाव मतदार संघातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, विक्रांत सावंत हे तरुण तडफदार नेतृत्व आहे. त्याचे आजोबा राज्याचे माजी मंत्री भाईसाहेब सावंत व वडील विकास सावंत यांचा राजकीय वारसा त्याला लाभलेला आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने विक्रांत सावंत यांच्या सोबत खंबीर उभे राहावे. विक्रांत हा स्व. भाईसाहेब सावंत यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. माजगावची ओळख खऱ्या अर्थाने स्व. भाईसाहेब सावंत यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर झाली आहे. भाईंचे पुत्र विकास सावंत यांनी हा वारसा पुढे चालवला. मागच्या काही वर्षांमध्ये सावंत कुटुंबीयांवर अनेक आघात झाले. हे आघात विक्रांत यांनी सहन केले आहेत. आज या घराण्याला माजगाव मतदार संघातील प्रत्येक मतदाराने जपण्याची गरज आहे.
विक्रांतला या निवडणुकीत आपल्या मताच्या रूपाने आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.


