मोपात शनिवारपासून तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
मोपा येथे शनिवारपासून तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजन माऊली एकता कला क्रीडा संस्थेने केले आहे. मोपा गावठणवाडा येथील माऊली एकता कला क्रीडा संस्थेच्या १९ व्या वर्धापनदिना निमित्त तिसऱ्या कै. विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर स्मृती नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला व सांस्कृतिक संचालनालय पणजी यांच्या सौजन्याने आयोजित केलेला हा नाट्य महोत्सव शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी पासून सलग ३ दिवस मोपा गावठणवाडा येथील श्री देव गिरोबा रंगमंचावर साजरा होणार आहे.
शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नाट्य महोत्सवाचे उदघाटन खासदार सदानंदशेठ तानावडे यांच्या हस्ते होईल. यावेळी पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर, कला आणि सांस्कृतिक खात्याचे उपसंचालक मिलिंद माटे, प्रसिद्ध रंगकर्मी गणेश ठाकूर, सरपंच सुबोध महाले, जिल्हा पंचायत सदस्य राघोबा कांबळी, पंचायत सदस्य काशीनाथ पेडणेकर, श्री देवी सातेरी माउली देवस्थानचे सर्व मानकरी उपस्थित राहणार आहेत.
उदघाटन समारंभा नंतर रात्री ९ वाजता नादब्रह्म सत्तरी निर्मित ‘बायको पाहीजे नखरे वाली’ हे नाटक सादर होईल. रविवार ८ रोजी रात्री ९ वा. सातपाटेकर दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा ‘वज्रघारीणी इंद्रेश्वरी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होईल.
सोमवार ९ रोजी संध्याकाळी ७ वाजता समारोप कार्यक्रम व रात्री ९ वाजता श्री क्रिएशन डिचोली निर्मित ‘फँमीली लय भारी’ हे विनोदी नाटक सादर होईल. या तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक गावकर यानी केले आहे.


