कायद्याचे कवच कोलझरवासियांसोबत, अॅड. संदीप निंबाळकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
जमिन विकायची नाही असा निश्चय ठाम असेल तर तुमची वडिलोपार्जीत मालमत्ता कोणीच हिरावून घेवू शकत नाही. कायद्याचे संरक्षक कवच तुमच्या सोबत असेल. गावचे ऐक्य आणि निश्चय हीच खरी ताकद असल्याचे प्रतिपादन जेष्ठ विधीज्ञ अॅड. संदीप निंबाळकर यांनी येथे केले.
कोलझर येथील ग्रामस्थांनी आपल्या वडिलोपार्जीत जमिनी विकायच्या नाहीत अशी शपथ घेतली आहे. गावातील पर्यावरण आणि त्यावर आधारीत लोकजीवन याचे संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरात दिल्ली लॉबी जमिनी घेण्यासाठी दबाव निर्माण करत आहे. त्याविरोधात या ग्रामस्थांनी हा लढा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या विनंतीवरून गुरूवारी सायंकाळी आयोजीत कायदेविषयक संवाद उपक्रमात अॅड. निंबाळकर बोलत होते. ते म्हणाले, “ग्रामस्थांनी पुर्वजांनी जपलेल्या जमिनी न विकण्याचा केलेला निश्चय कौतुकास्पद आहे. याला कायद्याचेही संरक्षण मिळणार आहे. कोणीही जबरदस्तीने तुमच्या जमिनी घुसखोरी करू शकत नाही. जमिन न विकण्याच्या निश्चयावर गावकरी ठाम राहिले आणि एकजूट कायम ठेवली तर कोणतीच धनशक्ती या गावाकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. पूर्वजांनी जपलेली ही संपत्ती राखणे आणि पुढील पिढीकडे तितक्याच संपन्नतेने सुपुर्त करणे हे आपले कर्तव्य आहे. कोलझरवासिय हे कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांचे हे पाऊल पूर्ण जिल्ह्यासाठी अनुकरणीय आहे.”
यावेळी कोलझर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई, पदाधिकारी हिरबा उर्फ आपा देसाई, महादेव देसाई, विश्वास देसाई, दौलत देसाई, राजाराम देसाई, बाळा देसाई, विकास सावंत, डी. बी. देसाई, सुदेश देसाई, देवेंद देसाई, मुरारी मुंगी, अनिल देसाई, प्रभाकर देसाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला.


