सावंतवाडी तालुक्यात संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यात आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले.
तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समिती मतदारसंघातील बांदा जिल्हा परिषद व शेर्ले पंचायत समिती बिनविरोध झाल्याने जि.प.च्या ८ तर पंचायत समितीच्या १७ जागांसाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. तालुक्यात सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जनतेचा कौल कुणाला मिळतो हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषदच्या 8 जागांसाठी 43 उमेदवार तर पंचायत समितीच्या 17 जागांसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 143 केंद्रांवर सुमारे 768 मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस होमगार्ड , पोलीस कर्मचारी असे एकूण 1 हजार 268 अधिकारी तैनात ठेवण्यात आले होते. माखडोल धवडकी शाळा नंबर 2 मध्ये ‘सखी मतदान केंद्र’ तर माजगाव शाळा नंबर एक मध्ये ‘आदर्श मतदान केंद्र’ उभारण्यात आली होती. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व अपंगांसाठी खास मतदान सुविधा ठेवण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यरत होती. तर पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले होता.
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे संदीप गावडे व उबाठा शिवसेनेचे रुपेश राऊळ यांच्यात तर कोलगाव मतदार संघात भाजपचे महेश सारंग व मायकल डिसोजा यांच्यात काटे की टक्कर होत आहे.


