मालवणी करंडक महोत्सवात” १२ एकांकिकांचा सहभाग …m स्वागताध्यक्ष बबन साळगावकर
सिंधुदुर्ग राजू तावडे
सावंतवाडी येथे दिनांक २७ फेब्रुवारी २ मार्च या कालावधीत होणाऱ्या मालवणी करंडक महोत्सवात एकूण १२ एकांकिकांचा सहभाग होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पाच जेष्ठ कलाकारांचा “कला गौरव” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती मालवणी करंडकचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत नगरपरिषदेच्या मेजर जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून त्या ठिकाणी तब्बल चार दिवस “फूड फेस्टिवल” चे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी महोत्सवाला साजेसा हा महोत्सव असणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पर्यटक व कलाप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बबन साळगावकर यांनी केले आहे.
या “मालवणी करंडक” महोत्सवात मुंबई-पुणे आणि गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १२ एकांकिका सहभागी होणार आहेत. यावेळी सावंतवाडी तालुक्यातून सचिन धोपेश्वरकर, कुडाळ तालुक्यातून अंकुश कुंभार, मालवण-भरड येथील सगुण पोयेकर, वेंगुर्ला-वडखोल येथील आनंद नार्वेकर, कणकवली येथील भास्कर उर्फ भाई सामंत या जेष्ठ कलाकारांचा “कला गौरव” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर, दादा मडकईकर, सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, सदस्य निरंजन सावंत, आनंद काष्टे, निखिल माळकर, प्रणव तारी, मृणाल चेंडके उपस्थित होते.
या महोत्सवात दिनांक २७ फेब्रुवारीला मॅड बॉक्स थिएटर मुंबई (ठोंब्या), २८ फेब्रुवारीला नाट्यसिंधू पुणे यांची (चित्रकथी), रंगवलय अंधेरी यांची (बार-बार), वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली यांची (पडीक), आघाझ द राय रायझिंग युथ यांची (लपंडाव) तर १ मार्चला अक्षर सिंधू साहित्य कला मंच, कणकवली यांची (भरकाट), आयडियल इंग्लिश स्कूल नेरुर यांची (देवराई), प्रथा थिएटर यांची (अमृत्सपुत्र), श्री गोपाळ कृष्ण कला मंच, तळाशील यांची (वाघ्या) तर २ मार्चला जी.एस. प्रोडक्शन यांची (गाऱ्हाणा), मॅड बॉक्स थिएटर यांची (बोबड्या), अभियांत्रिकी कला मंडळ, रत्नागिरी यांची (तुकारामाची टोपी) आदी एकांकिका सादर होणार आहेत.


