सावंतवाडीत पत्रकारांसाठी सर्व सोयींनी युक्त ‘पत्रकार भवन’ …..प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांसाठी सर्व सोयींनी युक्त असे ‘पत्रकार भवन’ उभारण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे नगरपरिषद इमारतीमध्ये असलेल्या सध्याच्या पत्रकार कक्षात आवश्यक सुविधा वाढवण्याबाबत येणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिले.
सावंतवाडी नगर परिषदेच्या पत्रकार कक्षाला आज शनिवारी ॲड. निरवडेकर यांनी सदिच्छा भेट देऊन पत्रकार कक्षाची पाहणी केली. या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, तालुका पत्रकार संघाचे सहसचिव विनायक गावस, हरिश्चंद्र पवार, राजू तावडे, सागर चव्हाण, अमोल टेंबकर, जतीन भिसे, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, व्हाईस मीडियाचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, सिद्धेश सावंत, आनंद धोंड, भुवन नाईक आदी प्रिंट आणि सोशल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री. निरवडेकर म्हणाले, शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता, पार्किंगसाठी विशेष उपाययोजना करण्याची माझी संकल्पना आहे. पणजी (गोवा) शहराच्या धर्तीवर इमारतींच्या वरील मजल्यावर पार्किंग करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे स्टेट बँकच्या जवळ ज्या ठिकाणी सध्या फोर व्हीलर पार्किंग आहे, त्या ठिकाणी इमारत बांधून दोन ते तीन मजल्यांवर पार्किंगची सोय करता येईल. शहरातील बाजारपेठेमधील वाहनांची कोंडी पाहता व्यापाऱ्यांशी चर्चा करून ‘वन-वे’ वाहतुकीचा पर्याय काढता येईल असे श्री. निरवडेकर म्हणाले.
मोती तलावाच्या काठावर सध्या असलेल्या झाडांच्या मुळांमुळे तलावाचा कठडा आणि फुटपाथ कमकुवत झाला आहे. यावर उपाय म्हणून १०० नवीन सावली देणारी, फळझाडे आणि पक्षांना आकर्षित करणारी झाडे लावली जातील. यासाठी ‘वृक्ष संवर्धन समिती’ नियुक्त करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा सुटण्याच्या वेळी होणारी गर्दी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर शाळांना खाजगी सुरक्षारक्षक नेमण्याबाबत चर्चा करण्यात येईल असे श्री. निरवडेकर यांनी सांगितले.


