सावंतवाडीत शहरात ‘डास निर्मूलन’ मोहीम सुरू
सिंधुदुर्ग /राजू तावडे
सावंतवाडी शहरात राबवण्यात आलेल्या ‘महास्वच्छता अभियाना’ला चांगले यश मिळत आहे. आता प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शहरात डास निर्मूलनाची धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली नागरिकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात पुर्ण होणार आहे.
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डास निर्मूलनासाठी फवारणी आणि फोगिंग करण्यात यावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी तात्काळ पावले उचलत संपूर्ण शहरात फोगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू केली आहे.
शहरातील ज्या भागांमध्ये अस्वच्छता आहे किंवा जिथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक आहे, अशा ठिकाणांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
अत्याधुनिक फोगिंग मशीनद्वारे औषध फवारणी केली जात आहे. ही मोहीम केवळ मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित न राहता, शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राबवण्यात येणार असल्याचे ॲड. निरवडेकर यांनी सांगितले.
“नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. डास निर्मूलनासाठी आम्ही वचनबद्ध होतो आणि त्या दृष्टीने ही मोहीम आता सातत्याने सुरू राहील. शहरातील एकही कोपरा फवारणीविना राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत.” अशी प्रतिक्रिया ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिली आहे.


