गुढी पाडव्याच्या शुभदिनी शेगाव मंदिरात भाविकांची गर्दी
बुलढाणा/ सचिन व्यवहारे
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्याची परंपरा जपत राज्यभरातून हजारो भाविक शेगावात दाखल झाले आहेत… श्री संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी कुटुंबासह उपस्थित राहून नववर्षाची सुरुवात भक्तीमय वातावरणात केली. शेगाव शहर पूर्णतः भाविकांनी फुलून गेले असून मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस प्रशासन आणि मंदिर समितीकडून भाविकांच्या सोयीसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेगावात भक्ती, उत्साह आणि श्रद्धेचे सुंदर दर्शन घडत असून नववर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात होत आहे.”


