शहराचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य उद्देश…् प्रभारी नगराध्यक्ष ॲड. निरवडेकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
विरोधक काय बोलतात याकडे लक्ष न देता सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल हा आमचा मुख्य उद्देश आहे. हा विकास पालकमंत्री नितेश राणे व भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून होणार आहे. नगरपरिषदेची सत्तासूत्रे हाती घेतल्यावर दोन महिन्यातच ६५ विकासकामांची अंमलबजावणी आज झालेल्या स्टॅंडिंग कमिटीच्या पहिल्या सभेत करण्यात आली, अशी माहिती सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिली. आज बुधवारी सावंतवाडी नगरपरिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आम्ही जिमखाना मैदान आणि भुयारी गटारी योजना या दोन्ही कामांना अधिक प्राधान्य दिले आहे.या सभेमध्ये तब्बल ६५ विकासकामांवर आम्ही भर दिला असून त्यापैकी नरेंद्र डोंगर येथे ४ कोटी रुपये खर्च करून योगा व मेडिटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. तर १ कोटी ६० लाख रुपये खर्चून राजवाडा समोरील तलावाकाठी ‘खाऊ गल्ली’ उभारण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रभागातील रस्ते, पाणी व इतर सोयी-सुविधा यावर आम्ही सर्वांना समान न्याय या चौकटीत बसून काम सुरू केले आहे. असे निरवडेकर यांनी सांगितले.
ॲड. निरवडेकर म्हणाले, शहरातील बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे पुन्हा नूतनीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंचे सहकार्य आम्हाला मिळणार आहे.
दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांचा चावा घेणाऱ्या कुत्र्याचा आम्ही बंदोबस्त केला आहे. मोती तलावा काठच्या झाडांचे काय करायचे याचा निर्णय वृक्ष कमिटी घेणार आहे. तर प्रशासकीय काळात काही इमारत बांधकामांना परवानगी दिली गेली. चुकीच काम होत असल्याबाबत काही ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रशासकीय काळात झालेल्या या कामाची चौकशी होईल. तसेच कारवाईची क्षमता देखील आमच्यात आहे. त्यामुळे निश्चितच संबंधितांना न्याय दिला जाईल, येणाऱ्या काळात रिझल्ट दिसेल असा विश्वास ॲड. निरवडेकर यांनी दिला.


