महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ला सिंधुदुर्गातून शेकडो मंदिर विश्वस्त रवाना
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
मंदिरांचे प्रभावी संघटन, मंदिरांचे सुप्रबंधन यासह मंदिरांच्या विविध समस्यांवर उपायोजना काढण्यासाठी २२ मार्च रोजी स्वराज सांस्कृतिक भवन, सातारा येथे चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ होत आहे. एक दिवसाच्या या परिषदेत मान्यवरांचे उद्बोधन, परिसंवाद आणि चर्चासत्रे होणार आहेत. २१ मार्चला या परिषदेसाठी राज्यातून नागपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगाव, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग यांसह जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून विविध मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी मोठ्या उत्साहात विविध गाड्यांमधून सातार्याकडे प्रयाण केले.
स्वराज सांस्कृतिक भवन, सातारा येथे होत असलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे. स्वराज्य सांस्कृतिक भवनाच्या मुख्य द्वारावर स्वागत कमान लावण्यात आलेली आहे. या संदर्भात मंदिर परिषदेचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या या परिषदेसाठी १ हजारहून अधिक विश्वस्तांची नोंदणी झाली आहे. विश्वस्त, प्रतिनिधी यांच्यामधे परिषदेला येण्यासाठी प्रचंड उत्साह जाणवत आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी यांच्या भेटी, संपर्क अभियान यांद्वारे परिषदेसाठी संपर्क अंतिम टप्प्यात असून सगळ्यांमध्ये परिषदेसाठी उत्साह जाणवत आहे !
या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, तसेच मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यात मंदिरांची सुरक्षा, ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय’, ‘मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, बांदा, दोडामार्गसह माडखोल, कुणकेरी, सांगेली, केसरी, पारपोली, ओवळीये, कारीवडे, बावळाट, डेगवे, उगाडे, तांबोळी, मोरगाव, पडवे-माजगाव आदी ठिकाणांहून देवस्थानचे १०० हून अधिक मानकरी, विश्वस्त शनिवारी या परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.


