सावंतवाडीत भव्य ‘मेगा मेडिकल शिबिरा’चे आयोजन ९४७ जणांची तपासणी …विविध शस्त्रक्रियाही संपन्न
सिंधुदुर्ग | राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुर्गम भाग आणि आरोग्य सुविधांची कमतरता लक्षात घेता, जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकातील रुग्णांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या स्पेशालिटी आरोग्य सेवा मिळाव्यात, या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथे भव्य ‘मेगा मेडिकल स्पेशालिटी’ तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात ९४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी अत्याधुनिक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा लाभ रुग्णांना मिळाला. विशेष म्हणजे, आता हे शिबिर दर तीन महिन्यांनी आयोजित केले जाणार आहे, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, नगरसेवक देव्या सुर्याजी, ‘सामाजिक बांधीलकी’ संघटनेचे प्रा. सतीश बागवे, प्रा. रवी जाधव, रूपा मुद्राळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे इतर जिल्ह्यांतील स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर शिबिरासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच २डी इको (2D Echo) आणि सोनोग्राफी मशीन्सची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांसह, डेरवणचे वालावलकर रुग्णालय, मुंबईचे कोकिळाबेन रुग्णालय आणि इतर नामवंत संस्थांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली.
या शिबिरात हृदयविकार, कर्करोग, नेत्ररोग आणि बालरोग अशा गंभीर आजारांवर विशेष भर देण्यात आला होता. डॉ. सागर कोल्हे (मूत्रविकार तज्ज्ञ), डॉ. अनिकेत वजराटकर, डॉ. पल्लवी देशमंतार (जनरल सर्जन), डॉ. निर्मला सावंत (हृदयरोग), डॉ. अश्विनी नाईक (फुफ्फुस विकार) यांच्यासह मानसोपचार, अस्थिव्यंग, स्त्रीरोग आणि दंतशल्य अशा विविध विभागांतील डॉक्टरांनी रुग्णांना मोलाचा सल्ला दिला.
शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले, तर नेटके रिपोर्टिंग सिस्टर दीक्षा वेंगुर्लेकर यांनी केले. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना तज्ज्ञांचा मोफत सल्ला आणि उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


