न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल म्हणजे शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधाचा विजय. डॉक्टर जयेंद्र परुळेकर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलावा लागणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी या महामार्गाला केलेल्या विरोधाचा हा एकप्रकारे विजयच आहे. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली आहे. प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, मुळात ह्या महामार्गासाठी कोणीही मागणी केलेली नव्हती. एकही निवेदन किंवा विनंती अर्ज या महामार्गाच्या मागणीसाठी करण्यात आलेला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री याविषयी म्हणतआहेत की, जिल्ह्याचे हित लक्षात घेऊनच आराखडा बदललेला आहे. पण जिल्ह्यातील जैवविविध निसर्गाची कत्तल करून कोणाचे आणि कसले हित साधले जाणार आहे? असा सवाल डॉ. परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.
शक्तिपीठ महामार्गाचा नव्या आराखड्यानुसार बारा ऐवजी आता तेरा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आधी प्रस्तावित ८०६ किमी ऐवजी आता ८५६ किमी अशी या महामार्गाची लांबी असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुर्वी प्रस्तावित १३ गावां ऐवजी काही गावं आता बदललेली आहेत. दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यात या महामार्गाचा प्रवास असणार आहे. विदर्भ कोकणाला जोडणारा महामार्ग अशी प्रसिद्धी सरकार तर्फे करण्यात येत आहे.पण जर आधीच नागपूर रत्नागिरी महामार्ग बांधकाम अंतिम टप्प्यात असताना नव्या महामार्गाची गरजच काय आहे? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
सिंधुदुर्गातील ज्या गावांतून हा महामार्ग प्रस्तावित आहे त्या सगळ्या गावांतील निसर्ग हा जैवविविध तर आहेच पण तेथील वन्यजीवन देखील विपुल आहे. प्रस्तावित आराखड्यातील सहा गावे इको सेन्सिटिव्ह जाहीर झालेली आहेत. संपूर्ण दोडामार्ग तालुक्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने वृक्षतोड बंदी आहे. अशावेळी ह्या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून कोणाचा विकास साधण्यात येणार आहे? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसवणार का? असा प्रश्न डॉक्टर परूळेकर यांनी उपस्थित केला आहे.
१०० मीटर रूंदीचा पट्टा वृक्ष तोड करून मोठमोठे भराव घालून हा महामार्ग जेंव्हा बांधला जाईल तेंव्हा त्या त्या गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण तर होईलच पण पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती शेती बागायती मध्ये उद्भवेल आणि छोट्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता परुळेकर यांनी व्यक्त केली आहे.
पर्यावरण रक्षण करण्यासाठी लढणाऱ्यांना “अडथळे निर्माण करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्ती” म्हणण्या पर्यंत पालकमंत्र्यांची मजल गेली आहे, या वरून हा महामार्ग होण्यासाठी त्यांच्यावर वरिष्ठांचा केवढा मोठा दबाव आहे हे स्पष्ट होत आहे. असे डॉक्टर परूळेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे