सावंतवाडी एसटी बस स्थानकाचा विकास बिओटी तत्वावर होणार… आमदार दीपक केसरकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी एसटी बस स्थानकाचा विकास बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा ( बिओटी) तत्वावर करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत आराखडा करण्यासाठी कंपनीची नेमणूक केली आहे. एस टी महामंडळाच्या सुमारे चार एकर क्षेत्रावर बस स्थानक, निवासी व्यवस्थापन आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून हे बसस्थानक विकसित केले जाईल अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज बुधवारी दिली.
सावंतवाडी बस स्थानकाची दुरावस्था गेले अनेक वर्ष झाली आहे. रेंगाळलेले होते .आता एसटी बस स्थानकांचे काम बीओटी तत्त्वावर लवकरच हाती घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे एसटी स्टँड असल्याने ते विमानतळाच्या धर्तीवर अद्यावत असे केले जाणार असून पुढील दोन वर्षात हे स्टॅन्ड उभारण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
श्री. केसरकर यांनी आज एसटी बस चालक परिसराची पाहणी केली. यावेळी या बसस्थानाचा आराखडा तयार करणारे हापीस कॉन्ट्रॅक्टर यांचे हुजेफा भोल, एसटीचे विभागीय अभियंता अक्षय केकरे, नगरपालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर, पालिकेचे बांधकाम अभियंता तुषार सरडे, आगार व्यवस्थापक निलेश गावित उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना आमदार केसरकर म्हणाले, बस स्थानक अद्यावत असे उभारत असताना कोणीही विस्थापित होता कामा नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. तसेच वेंगुर्ला बस स्थानक आणि सावंतवाडी बस स्थानक यांच्यामध्ये जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखान्याचा अडथळा निर्माण होत आहे. हा दवाखाना दुसरीकडे हलवण्यासंदर्भात बोलणे सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी बस स्थानक हे मोठे असल्याने विमानतळाच्या धर्तीवर याचा कायापालट केला जाणार आहे. या आराखड्यानुसार उभारण्यात आलेले डेपोची इमारत तशीच ठेवून अन्य ठिकाणी नव्या आराखड्यानुसार काम होणार आहे. एकूण शंभर वर्षाचा करार करण्यात येणार असून साधारण चार एकर मध्ये हे बस स्थानक उभे राहणार आहे. यामध्ये चार्जिंग स्टेशन तसेच अन्य विविध गोष्टी समाविष्ट आहेत. तसेच कमर्शियल बाबींचा विचार करता त्या ठिकाणी दुकान गाळे सुद्धा समाविष्ट आहेत. तसेच रिक्षा स्टँडवर देखील नव्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. असे श्री. केसरकर म्हणाले.


