पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाला केराची टोपली… जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री कणकवली, कुडाळ आघाडीवर
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
कॅन्सर ला कारण ठरणारा आणि मोठ्या प्रमाणात युवा पिढीला बरबादीला नेणा-या गुटख्यावर बंदी असतानाही जिल्ह्यात त्याची विक्री होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत काही कनिष्ठ पोलिस वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या धुळफेक करीत स्वतःहून ‘आर्थिक तडजोड करीत हि गुटखा विक्री सुरू केली असल्याची माहिती समजते.
महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी यावर बंदी आहे. मात्र लगतच्या मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा येथे पान मसाला या उत्पादनावर बंदी नाही. त्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात पान मसाला, गुटखा जिल्ह्यात येत असतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी या अवैध आणि हानिकारक वस्तू वर विक्रीस तीव्र नापसंती व्यक्त करीत अशा गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावर काही प्रमाणात कारवाई होत काही दिवस गुटखा विक्री बंद होती. जूने एजंट यांनी गुटखा विक्री बंद केली असताना आता नवीन एजंट तयार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नवीन एजंट तयार झाले असून हे एजंट हप्ता बंद झालेल्या काही कनिष्ठ पोलीसांनी, वाहतूक पोलीसांनी तयार केले असल्याचे बोलले जात आहे. सिंधुदुर्गात सध्या गोवा, कोल्हापूर मार्गे खाजगी बस, ट्रान्सपोर्ट, भाजी विक्री करणाऱ्या ठराविक गाड्या,एस.टी. या मधून गुटखा आणला जात आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सिमेवरील भागात गोव्यात गोदाम करण्यात आली आहेत. या ठिकाणी ड्युप्लिकेट पानमसाला , तंबाखू बनविण्यात येत असल्याचे समजते. कर्नाटक, हैदराबाद वरून येणाऱ्या खाजगी बसेस , ट्रान्सपोर्टमधून गोव्यात गुटखा येतो आणि तिथून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात गुटखा विक्री होत असल्याचे समजते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कमी दराच्या गुटख्याने उच्छाद मांडला असून गुटख्यासह, पान मसाला नावाने ५ रू. विक्री प्रमाणे तो विकला जात आहे. त्यामुळे युवा वर्ग त्याकडे आकर्षित होत असून ते धोकादायक आहे. ओसरगाव टोल नाका येथे काही पोलीस ‘तोडपाणी’ अशी गुटखा विक्री करणारी वाहने सोडत आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक गुटखा विक्री हि पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या मतदारसंघात होत आहे. या घातक विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, आणि राणे समर्थकांनी पावले उचलण्याची गरज आहे. कारण नितेश राणे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.


