न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’ वर….. डॉ. जयेंद्र परुळेकर ‘जनता आरोग्य दरबारात’ आरोप

 

​सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ती सध्या ‘व्हेंटिलेटर’वर आहे. जिल्ह्यातील ७० टक्के आरोग्य सेवा, खाजगी रुग्णालये आणि डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जात आहे, तर शासन केवळ ३० टक्के सेवा देत असून त्यातही त्यांना अपयश आले आहे, असे मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित ‘जनता आरोग्य दरबारात’ ते आज बुधवारी बोलत होते.
​या दरबाराला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले, सभापती सुष्मिता जाधव, एन. बी. रेडकर, डॉ. धनंजय काकडे, सभापती सुधीर आरीवडेकर, सभापती सौ. दिपाली भालेकर, सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका मोहिनी मडगावकर,सतीश बागवे, संजय लाड, नंदन वेंगुर्लेकर, ओंकार तुळसुलकर, रवी जाधव, रवींद्र ओगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​ ​डॉ. परुळेकर म्हणाले, “डॉक्टरांना मिळणारा अल्प पगार, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि ढिसाळ यंत्रणेमुळे तज्ज्ञ डॉक्टर जिल्ह्यात येण्यास तयार नाहीत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी ६ रुग्ण गोव्यातील बांबुळी रुग्णालयात रेफर केले जातात. उपजिल्हा रुग्णालयात १९ पदे मंजूर असताना केवळ ५ डॉक्टर सेवा देत आहेत. तो भार सांभाळत असताना पायाभूत सुविधा आणि यंत्रसामुग्रीची वानवा आहे.
​​जिल्ह्यात ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी केवळ ८ केंद्रांत एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध आहेत. उर्वरित ठिकाणी बीएएमएस किंवा नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम चालते. “ग्रामीण जनतेला जणू गुरेढोरे समजून हा विभाग हाताळला जात आहे,” अशी घणाघाती टीका डॉ. परुळेकर यांनी केली.
. विदर्भाच्या धर्तीवर सिंधुदुर्गातही डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी विशेष धोरण राबवण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर , आमदार निलेश राणे, आरोग्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव मांडला जाईल. रिक्त पदे भरण्यासाठी आणि उपकेंद्रांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे ​आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी यावेळी सांगितले.
​नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता आणि पाणी प्रश्नावर भर दिला असून शवविच्छेदन इमारतीची स्थिती सुधारण्यासाठी बांधकाम विभागाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
​ ​जनता आरोग्य दरबाराचे समन्वयक एन. बी. रेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था ‘गुरांच्या गोठ्या’सारखी झाल्याची टीका केली.
नंदन वेंगुर्लेकर म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५०० मंजूर पदांपैकी ३०-३५ टक्के पदे भरली आहेत, रिक्त पदे त्वरित भरली जावीत.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत आणि डॉक्टरांना चांगले पॅकेज द्यावे.
गुणेश गवस यांनी ​ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा. व कर्मचारी भरती व्हायला हवी याकडे लक्ष वेधले.
श्री. वागळे यांनी ​१०८ रुग्णवाहिकेची सेवा आणि जिल्ह्यातील बंद अवस्थेतील ‘ब्लड बँक व्हॅन’ त्वरित सुरू करावी अशी मागणी केली.
​या वेळी ॲड. नंदन वेंगुर्लेकर, ॲड. ओंकार तुळसुलकर, पत्रकार शेखर सामंत, विनोद शेंडे , रवी जाधव, संजय लाड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य प्रश्नावर आपल्या व्यथा मांडल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे